डॉ. गिरीश जाखोटिया / व्हा अभिव्यक्त!
एकदा काय झालं,
गम्मतच झाली !
एका लबाड धर्मगुरुने
एका भ्रष्ट उद्योगपतीच्या
आत्मचरित्राचं प्रकाशन केलं.
दोघांनी मग तोंड फाटेस्तोवर
एकमेकांची स्तुती केली.
उपस्थित भाबडे सज्जन यावर
सतत टाळ्या वाजवीत राहिले.
एकदा काय झालं,
गम्मतच झाली !
एका विद्वानाने लिहिलं,
“स्रियांनी नोकरी करु नये.”
विद्वानाच्याच पुढारलेल्या समाजातील
नोकरी करणाऱ्या स्रियांनी
त्यांस जाब विचारला,
तेव्हा विद्वान निरूत्तर झाला.
मग त्या सुजाण स्रियांनी
त्या विद्वानावर पूर्ण बहिष्कार घातला.
एकदा काय झालं,
गम्मतच झाली !
एका उद्योगपतीने
भ्रष्ट नि अहंकारी
राष्ट्रप्रमुखाच्या गौरवार्थ
खूप संदेश लिहिले.
मग उद्योगपतीला
राष्ट्रीय सन्मान मिळाला नि
त्याच्या भाबड्या भागधारकांनी
त्याचा गलेलठ्ठ सन्मान केला.
एकदा काय झालं,
गम्मतच झाली !
एक महान सांस्कृतिक नेता
आपल्या भाषणात
अमेरिकी संस्कृतीला
खूप शिव्या घालू लागला .
ऐकणारे सारे वृध्द श्रोते
वेगाने उठून गेले.
कारण त्यांची मुले
अमेरिकेतून मनीऑर्डर पाठवायची.
एकदा काय झालं,
गम्मतच झाली !
एक धर्मगुरू आधुनिकतेला
दोष देत, सातव्या इसवी सनाचे
गुणगान गावू लागला.
सभेतील एक चिमुरडी उठली
नि म्हणाली,
” महोदय, तो लाऊडस्पीकर आणि
मोबाईल सोडून द्या.
घरी कारने न जाता पायी जा.”
एकदा काय झालं,
गम्मतच झाली.
सरकारी कृपेने अल्पावधीतच
एक उद्योगपती फुग फुग फुगला.
त्याला मग देशाबाहेरील
स्पर्धेचं आमंत्रण आलं
तर हा घाबरला की हो !
म्हणाला, “माझ्या कुंडलीत
विदेशी उद्योगाचे योगच नाहीत.”
(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात.)
ई-मेल – girishjakhotiya@gmail.com
Copyright ©jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.