डॉ. गिरीश जाखोटिया
नमस्कार मित्रांनो !
धर्म अर्थकारणाची दिशा ठरवतो की अर्थकारण धार्मिक तत्वांना नाकारून वा त्यांना भ्रष्ट करीत पुढे जातं ? दोघेही एकमेकांवर कुरघोडी करताना सामान्य जनतेचं काय होतं ? विवेकहीन झालेलं राष्ट्र दोघांनाही गमावून बसतं का ? अर्थकारणासाठी धर्माशी फारकत घेतलेले लोक यशस्वी आणि समाधानी झालेत का ? – या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा जटील प्रयत्न मी माझ्या “Economics of Survival” हा ग्रंथ लिहिताना केलाय. युरोपातील ब्रिटन, फ्रांस, जर्मनी, पोलंड, युक्रेन, ग्रीस, स्पेन, स्विझर्लंड, इटली इ. देश ख्रिश्चन असूनही यांचे आपापसातील आर्थिक सहकार्य ठीक नाही. जर्मनीचा अपवाद वगळता बाकीच्या देशांच्या अर्थव्यवस्था बऱ्यापैकी अडचणीत आहेत. रशिया व अमेरिका हे बहुतांशाने ख्रिश्चन देश आहेत. (या देशांमध्ये मोठ्या संख्येने लोक ‘धर्म’ ही संकल्पना मानत नाहीत. असे धर्म न मानणारे बरेच लोक अर्जेंटिना, जर्मनी, उरुग्वे, व्हिएतनाम, चीन, द. कोरिया, कॅनडा इ. देशातही आहेत.) परंतु या दोन देशांची राजकीय व आर्थिक विचारसरणी खूप भिन्न भिन्न आहे. चीनसाठी “कम्युनिस्ट पार्टी” जे सांगते तोच धर्म. आज ‘ख्रिश्चन’ रशिया व ‘कम्युनिस्ट’ चीन अर्थकारणात बऱ्याच गोष्टी एकत्रितपणे करताहेत. (चीनने ‘कम्युनिझम’ हा भांडवली आर्थिक प्रेरणांसाठी वापरला तर रशियाने तो ‘सैनिकी’ शोषणासाठी वापरला.) ख्रिश्चन असलेल्या युरोप व अमेरिका यांच्यात चीनशी संबंध ठेवण्याबाबत एकमत नाही. बौद्ध असणारा जपान व बौद्धबहुल असणारा द. कोरिया आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी संपन्न आहेत परंतु म्यानमार, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया हे बौद्ध देश कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत. मेक्सिको व द. अमेरिका खंडातील बहुतेक ख्रिश्चन देश ( ब्राझील, पेरू, वेनेझुएला, कोलंबिया, अर्जेंटिना, बोलिविया, उरुग्वे इ.) हे सुद्धा कनिष्ठ मध्यमवर्गीयच आहेत. (इथे कनिष्ठ मध्यमवर्गीयांची व्याख्या ही तौलनिक आहे.)
अर्थकारण, संस्कृती व भूराजकीय वास्तविकतेनुसार माझ्यामते जगातील मुस्लीम देशांचे चार गट पडतात. मध्य आशियातील तेल – उत्पादक देश हा पहिला गट जो खनिज तेलावर आणखी फारतर ७० – ८० वर्षे तगू शकेल. तेलाची समृद्धी काही परिवारांमध्येच रहावी व त्याविरुद्ध जनतेने उठाव करू नये म्हणून येथील स्थानिक अरबांना कमी काम व जास्त दाम दिला जातो. अर्थात त्यामुळे यांच्या अर्थव्यवस्था बाहेरून आलेले हिंदू, मुस्लीम, बौद्ध व ख्रिश्चन कर्मचारी चालवतात. दुसरा गट हा उत्तर आशियायी व आफ्रिकी देशातील मुस्लीमांचा. लिब्या, इजिप्त, सुदान, अल्गेरिया, नायगर, माली इ. सुन्नीबहुल आफ्रिकी देश व उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, तजिकिस्तान, किर्गिझस्तान इ. उत्तर आशियायी देश जरी सुन्नी मुस्लीम असले तरी यांची संस्कृती भिन्न आहे. आफ्रिकी मुस्लीम देश गरीब आहेत तर उत्तर आशियाई मुस्लीम देश हे नव्या उमेदीने जगाकडे पहाताहेत. मुस्लिम देशांचा तिसरा गट हा दक्षिण आशियाई – पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान असा आहे. (या तीन देशातील व भारतातील मुस्लीम हे जगातील एकूण मुस्लिमांच्या संख्येपैकी साधारण ३४% इतके आहेत.) या एकूणच मुस्लीमांची आर्थिक अवस्था ही वाईट आहे. चौथा गट हा मलेशिया व इंडोनेशिया येथील प्रागतिक मुस्लीमांचा. (मलेशिया आस्तेकदम कट्टरतेकडे झुकतो आहे.) यांची संस्कृती ही उद्योग व अर्थार्जनास पूरक राहिली आहे.
ओल्ड कमांडमेंट म्हणजे जुना करार मानणारे ज्यू लोक प्रचंड कष्टाने व धैर्याने इस्राएल बनवू शकले परंतु यांच्या एकूणच अर्थकारणाबद्दल प्रगत देशांमध्ये संमीश्र मत आहे. इस्राएलचे राष्ट्रप्रमुख नेतान्याहू हे भ्रष्टाचाराच्या गंभीर कृत्यांमुळे सत्ता गमावून बसले. जेरुसलेम या प्राचीन शहरावर श्रद्धेच्या अर्थाने ख्रिश्चन, मुस्लीम व ज्यू या तिन्ही धर्मींयांचा समान अधिकार चालत आलाय. परंतू अमेरिकेने एकतर्फी फतवा काढला नि जाहीर केलं की हे शहर ज्यूंची राजधानी असेल. अर्थात पॅलेस्टाईन जनतेवर इस्राएलचा भूराजकीय अन्याय हा चालू आहेच. (आमच्या येथील काही मूलतत्त्ववादींना ज्यूंना मारणारा हिटलरही आवडतो आणि पॅलेस्टाईन लोकांची जिरवणारे ज्यू सुद्धा आवडतात !). (पर्शियाचे अग्नीपूजक) असलेले पार्सी उद्योजक भारतीय अर्थकारणाच्या अग्रभागी राहिले आहेत. धार्मिक आणि आर्थिक नीतीनियमांचा यांनी बराच चांगला मेळ घातला. दक्षिण भारतीय दिगंबर जैनांनी सत्य,अपरिग्रह, अहिंसा इ. धार्मिक तत्वांची अर्थकारणाशी चांगली सांगड घातली. पंजाबातील शीख हे त्यांच्या कारसेवा, लंगर व आर्थिक स्वाभिमानासाठी आणि कष्टासाठी सर्वत्र ओळखले जातात. संत बसवण्णांना मानणारे दक्षिणेतील लिंगायतसुद्धा साधी रहाणी व आर्थिक – शेतकी शिस्तीसाठी ओळखले जातात.
धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चतुःसुत्रीचा हिंदू तत्वज्ञानामध्ये मोठा बोलबाला आहे. बऱ्याच हिंदू उद्योगपतींनी ‘सामाजिक अर्थकारणा’बाबतीत चांगलं काम केलं आहे. आर्थिक बचत, विवाह व कुटुंब व्यवस्था इ. बाबतीतली बलस्थाने सोडता “चातुर्वर्ण्यव्यवस्था, ती राबविण्यासाठीच्या बऱ्याच अंधश्रद्धा, बहुजनांचे व स्रियांचे शोषण करणारी व्यवस्था व तशा परंपरा” हे आमच्या धर्मकारणाचं व म्हणून अर्थकारणाचं मोठं दुर्दैवी वैशिष्ट्य राहिलेलं आहे. एक अगदी साधं उदाहरण याबाबतीतलं म्हणजे बराच मोठा काळ समुद्र लांघण्यावर असलेली येथील बंदी. सामुद्रिक प्रवास करणाऱ्यांना जगातील उत्तम प्रथा जर कळल्या तर “व्यवस्था – बदला”चे वारे इथे वाहू लागतील, या भीतीने येथील तथाकथित सांस्कृतिक धुरीणांनी समुद्रबंदीच लादली. यामुळे आमची प्रचंड हानी झाली. सातशे वर्षे बाह्यआक्रमक इथे राज्य करु शकले कारण एका बाजूला आम्ही चातुर्वर्ण्यव्यवस्थेमुळे दुभंगलेलो, धार्मिक अंधश्रद्धांमुळे परावलंबी झालेलो आणि दुसऱ्या बाजूला वैज्ञानिकदृष्ट्या बदलणाऱ्या जगाचे ज्ञान नसलेलो ! जर्मनी, द.कोरिया, जपान, अमेरिका, फ्रान्स, न्युझीलंड इ. देशांनी वेळीच धर्म आणि संस्कृती यामधील फरक समजत स्वतःची एक कार्यसंस्कृती बनवली जिने त्यांना “बलवत्तर” राष्ट्र बनवलं. कायद्याने एखादा देश तांत्रिक दृष्ट्या निर्माण करता येईल पण तो “राष्ट्र” बनण्यासाठी उदात्त अशी संस्कृती लागते.
आम्हाला कर्मकांडात, भाकड कथांमध्ये, मूर्खपणाच्या अनेक परंपरांमध्ये, जातीय अहंकारात नि ऐतखाऊपणात, कनिष्ठ जातींच्या व स्रियांच्या शोषणात इतकं करकचून बांधून ठेवण्यात आलं होतं की न पटणाऱ्या गोष्टींबद्दल साध्या शंकासुद्धा विचारायच्या नाहीत. येथील धार्मिक दुढ्ढाचाऱ्यांचं एक आवडतं विधान (जे आजही कार्यरत आहे) – “बघा हा शंखाखोर अश्रद्ध ! याला आपल्या परंपरांचा अभिमान नाही.” – कोणत्या परंपरा, ज्या जातींची उतरंड सांभाळू इच्छिणाऱ्यांना व महिलांना दुय्यम – तिय्यम दर्जा देणाऱ्यांना बव्हंशी सोयीच्या होत्या ? अर्थकारणासाठी उत्तम व्यापार, उत्तम शेती व उत्तम कार्यक्षमतेची – कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. सोबतीला उत्तम प्रशासनाचीही गरज असते. यासाठी नवनव्या संशोधनातून सुधार करावा लागतो. जगभरातील उत्तम परीमाणे तपासून स्विकारायची असतात. तब्बल तीन – चार हजार वर्षांपूर्वी कृष्णाला ही बाब माहीत होती. पर्जन्यवृष्टीसाठी इंद्रपूजेचा भंपकपणा त्याने बंद केला. भीष्म, द्रोणाचार्य व कर्ण हे परशुरामाकडून शस्रकौशल्य शिकलेले. त्यांचा मुकाबला करण्यासाठी अधिक चांगलं तंत्रज्ञान हवं म्हणून कृष्णाने अर्जुनाला परशुरामाचे गुरु असलेल्या महावैज्ञानिक शंकराकडे पाठवलं. त्यानंतरच्या मोठ्या कालखंडात मात्र आमची प्रगतीची व्याख्या व परीमाणे काय असावीत या बाबतीत आमच्याकडे प्रचंड गोंधळ माजला. दूरदर्शी असणाऱ्या शिवरायांनी सतराव्या शतकात सागरी आरमार, चलन व्यवस्था, शेतीचं व्यवस्थापन, सामरिक तंत्रज्ञान इ. अनेक आघाड्यांवर नवी परीमाणे वापरली. “मनुष्यबळ, मनोबल आणि द्रव्यबळ” ही त्रिसुत्री आपल्या अनुयायांना सांगताना डॉ. आंबेडकरांना अशीच प्रागतिक परीमाणे अभिप्रेत होती.
“आम्ही सांगू, लिहू व करु तेच सर्वश्रेष्ठ. आम्हाला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही.” – या आमच्या आढ्यताखोरपणामुळे आम्ही अर्थकारण, उद्योग व भौतिक जीवन सुधारणारे संशोधन बरीच शतके केलेच नाही. १३५ कोटी लोकसंख्येचा हा देश ऑलिम्पिकमध्ये किती पदके मिळवत आलाय ? जगातील महाकाय व उत्तम कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्या किती आहेत ? येथील पुढारलेल्या समाजातील हुशार मुलांना पश्चिमी देशांमध्ये संशोधन करायला का आवडतं ? – कारण तिथे तथाकथित परंपरांचा दांभिकपणा नसतो. “का आणि कसे” हे दोन प्रश्न विचारण्याची मुभा प्रागतिकतेकडे घेऊन जाते. पुनःपुन्हा अध्यात्माच्या नावाखाली “जगत् मिथ्या” हा चुकीचा विचार आम्ही मुलांना देत राहिलो. यामुळे झालं असं की अर्थकारण व धर्मकारण या दोन्ही आघाड्यांवर आम्ही घसरत गेलो. धर्मकारणात नीतीमत्तेला संपूर्ण प्राधान्य देण्याऐवजी आम्ही दिखाऊ कर्मकांडाला व वरीष्ठ जातींच्या वर्चस्वाला महत्त्व दिले. “विवेक व विज्ञान यांची यथार्थ सांगड घालणे” आज जवळपास सारेच देश विसरून गेले आहेत. चीनच्या आश्चर्यकारक आर्थिक व सामरिक प्रगतीच्या आम्ही जवळपासही नाही आहोत. हां, परंतु चीनचा सामाजिक अर्थकारणाचा आराखडा हा नीतीमान नसल्याने येणाऱ्या दहा – पंधरा वर्षांत चीनचे अंतर्गत प्रश्नच विघटनकारी ठरतील. ( हे माझं हवेतलं विधान नाहीय.) नीतीशास्त्राला (काही मुलभूत सत्ये सोडल्यास) सातत्याने विवेक व विज्ञानाच्या एकत्रित कसोट्यांवर तपासावे, सुधारावे लागते. नीतीनियमांची व्याख्या ही एका व्यक्तीसमूहाची मक्तेदारी होऊ शकत नाही. आज जगाच्या पाठीवर जवळपास ९०% लोक अस्वस्थ, असहाय्य व नाखूष आहेत. धर्मातील नीतीमत्ता व अर्थकारणाचे नियम पुनःपुन्हा जेव्हा “शोषक”च ठरवत रहातात, तेव्हा नक्कीच दुरावस्था उद्भवते. जग सध्या या दुरावस्थेतून जात आहे. दुरावस्था ही अर्थातच शोषकांना सुद्धा कालांतराने नाहीशी करते!
(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात.)
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.