डाॅ. श्याम टरके
ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे यांची पहिली साहित्यकृती ‘अस्वस्थ नोंदी’ चे ३ जानेवारी २०२२ रोजी पुण्यात प्रकाशन होत आहे. त्यातील सर्वसामान्यांच्या कथा वाचल्यानंतर प्रकाशनासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य यथार्थ ठरते. या पुस्तकाचा हा परिचय.
जंगली बुक अँड पब्लिकेशन आणि पत्रकार गिरीश अवघडे यांची ‘अस्वस्थ नोंदी’ ही पहिलीच निर्मिती. प्रकाशक दिलीप वाघमारे व लेखक अवघडे दोघेही पत्रकार हे आणखी एक वैशिष्ट्य. आहेत. दिल्लीतील सामान्य माणसं आणि त्या प्रश्नांवर आधारित या ‘अस्वस्थ नोंदी’ आहे. पत्रकार अवघडे यांनी अनुभवांती लिहिलेले पुस्तक असल्याने माध्यम क्षेत्रातील इतरांनाही ते मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे ते वाचायला हवे. तसे ते वाचनीय आहेच. भाषाही सहज समजणारी आहे.
‘अस्वस्थ नोंदी’त पंजाबी, राजस्थानी, हरियाणवी, उत्तरप्रदेशातील माणसांसोबतचे संवाद आणि अनुभव लेखकाने शब्दबद्ध केलेले आहेत. लेखक परिस्थितीनुरूप भावूक होतो. मनन, चिंतन करतो, काही प्रश्न स्वत:लाच विचारतो, तर काही प्रश्नांना उत्तरही देऊ शकत नाही, अशी परिस्थिती परमुलखात अनुभवतो. अन् त्यावर लिहितो. दिल्लीत पत्रकारिता करताना प्रसंगानुरूप भेटलेल्या व्यक्तींच्या नोंदी ठेवतो. त्या नोंदी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. तशाच त्या वाचकालाही अस्वस्थ करणाऱ्या आहेत. झगमगाटातील दिल्ली आपण पाहतो. परंतु त्याच दिल्लीची दुसरी दुखरी बाजू ‘अस्वस्थ नोंदी’त उलगडत जाते. सामान्य माणसांच्या आयुष्यावरील परिस्थितीचे ओरखडे अस्वस्थ करतात.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी या गावच्या अवघडेंनी हैद्राबादनंतर दिल्लीत पत्रकारिता केली. दिल्लीत पहिल्याच दिवशी ‘रेड लाइट एरिआ’त जीवाचा थरकाप उडवणारा अनुभव घेताना, वडीलधाऱ्यांची पुण्याई त्यांच्या कामाला येते. दिल्लीतील एन्ट्रीलाच दिल्लीची ‘छाया’ लेखकाला भेटते व तिच्या अनुभवांनी लेखकाचाही थरकाप उडतो. वयोवृद्ध आजी आजोबांची नात आणि तिचे धैर्य, कमी वयाच्या लेकरांना धनाढ्यांच्या घरी मोलकरीण म्हणून नाइलाजाने करावे लागणारे काम, बालकामगारांची होणारी घुसमट आणि गरिबीचे चटके, कार्गो सेवेतील इमानदार रामपाल आणि त्याची शुद्ध इमानदारी, चोरीची रामपाल यांना येणारी चीड, पत्रकारिता करताना विध्वंसक पत्रकारितेला छेद देत, माणुसकी धर्म पाळत आत्मदहनापासून परावृत्त करण्याचा प्रसंग, मुंबई बॉम्बस्फोटात आई-वडील गमावलेला दाऊद इब्राहिमचा हिंदू-मुस्लीम धर्मांप्रती सहिष्णूभाव, मेट्रो स्टेशनवर प्रेयसीला प्रेमाने कोरलेले नाव दाखवणारा कामगार, अन् नंतर मेहनतीने झालेला शिक्षक आदींसह स्वत:ची मुलगी नसतानाही तिच्या लग्नासाठी धडपडणारा तिचा बाप. एक हजार रुपये एकरने पाच एकर जमीन विकून मुलीचा उपचार करणारा रिक्षाचालक आणि शहीद जवानाच्या गावात जाऊन दिलेली भेट, अशा अनेक दिल्लीतील आठवणींच्या नोंदी आहेत. लेखकाने त्या संवेदनशीलता, सूक्ष्म निरीक्षण करत वेळातील वेळ काढून नोंदवलेल्या आहेत.
दिल्लीत टीव्ही पत्रकारिता करताना सायकल रिक्षा, ऑटो, मेट्रोच्या प्रवासात अनेक बारकावे लेखकाने अचूक टिपले आहेत. त्यांनी सामान्यांना बोलते केले, स्वत: अनुभवले ते लिहिले. त्यातून जीवनाच्या अनेक रंगछटा व प्रसंगांना त्यांनी शब्दात गुंफले आहे. अशा प्रकारचे जीवन जगणारे पत्रकार क्वचितच आढळतील. लेखक स्वत:ला ‘लेखक’ म्हणून घेत नाहीत, हे विशेष. मात्र, अरविंद जगताप यांची पुस्तकाला प्रस्तावना आहे. यात ते अवघडेंना ‘लेखक’ असल्याचे प्रशस्तीपत्र देतात. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातील प्रत्येकाने पत्रकाराच्या या ‘अस्वस्थ नोंदी’ अवश्य वाचायला हव्यात.
डॉ.श्याम टरके,
माहिती सहायक,
माहिती केंद्र, औरंगाबाद
मो.क्र. 9860078988
पुस्तकाचे नाव : अस्वस्थ नोंदी
प्रकाशक : जंगली बुक्स अँड पब्लिकेशन
किंमत : रुपये 125/- फक्त
पृष्ठे : 84
पुस्तकासाठी संपर्क : 9422202237