ठळक बातम्या: १) शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ गेल्या कित्येक वर्षांपासून सुरळीत सुरू होता. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या संगनमताने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमाने गव्हाच्या जागेवर निकृष्ट दर्जाचा मका देऊन गरिबांची थट्टा केली आहे, अशा अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महेश पवार यांनी केली आहे. २) औरंगाबादमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोघेही आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत हे आता हळूहळू सर्वसामान्य लोकांनाही कळू लागले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढत चालल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. ३) सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास एका चहावाल्यासह काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान बिबट्या अद्यापही रॉकेल लाईन परिसरातील एका पडक्या घरात लपला असून वनविभागाकडून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगली शहरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक याठिकाणी हा बिबट्या दबा धरून बसला असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ४) पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये देशभरात बँका १५ दिवस बंद राहतील. महाराष्ट्रात पुढील महिन्यात बँका १० दिवस बंद राहतील. त्यामुळे पुढील महिन्यात महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करायचे असतील तर बँका कधी सुरु आहेत आणि कधी बंद आहेत, हे माहिती असणे गरजेचं आहे. तुमची सर्व महत्त्वपूर्ण कामे वेळेत करुन घेण्यासही मदत होईल. येत्या २०२१- २२ (एप्रिल ते मार्च) आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस १ एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत. ५) हापूस! कोकणचा राजा. जगाच्या बाजारपेठेत देखील हापूसला मोठी मागणी आहे. पण, यंदा नैसर्गिक संकटांमुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्यानं अद्याप देखील अपेक्षित प्रमाणात हापूस बाजारपेठेत दाखल झालेला नाही. लांबलेला पाऊस, थंडीचं कमी प्रमाण, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला. हे नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय वाढत्या उष्णतेचा परिणाम आता हापूसवर झाला आहे.