मुक्तपीठ टीम
कॅमेरिक अँटीजेन रिसेप्टर टी-सेल (CAR-T) थेरपी कर्करोगाच्या उपचारात रामबाण उपाय म्हणून उदयास आली आहे. जगभरात चालू असलेल्या क्लिनिकल चाचण्यांनी शेवटच्या टप्प्यातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दाखवले आहेत. तीन महिन्यांपूर्वी आठ वर्षांच्या चिमुरडीच्या पालकांना ती काही आठवड्यांची पाहुणी असल्याचे समजले. या चिमुरडीला रक्ताचा कर्करोग होता. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर २०२० पासून तिच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांनी तिच्या पालकांसमोर पर्याय ठेवला. जीन थेरपीच्या घरगुती आवृत्तीचा पर्याय होता. ही पद्धत पाश्चिमात्य देशांमध्ये वापरली जाते. इगतपुरीजवळील एका खेडेगावातील चालक असणाऱ्या तिच्या वडिलांकडे दुसरा पर्याय नव्हता. मुलीची अवस्था फारच वाईट होती, तिचं जगणंही कठीण होतं. तिच्या वडिलांनी या उपचाराला होकार दिला आणि तिचे प्राण वाचले.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, “आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी खारघरमधील टाटा मेमोरियल सेंटरच्या संशोधन शाखा ACTREC ला भेट दिली. या उपचाानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या मुलीच्या रक्तात कर्करोगाच्या पेशी आढळल्या नाहीत. दोन वर्षांत ती पहिल्यांदाच सामान्य दिसली.”
CAR-T म्हणजे काय?
- CAR-T सेलच्या इम्युनोथेरपीचे एक नवीन रूप आहे.
- टी-सेल थेरपी ही लॅबमध्ये टी पेशी (एक प्रकारची पांढऱ्या रक्तपेशी) नावाच्या रोगप्रतिकारक पेशींमध्ये बदल करण्याची एक पद्धत आहे ज्यामुळे ते कर्करोगाच्या पेशी शोधून त्यांचा नाश करू शकतात.
- कर्करोग हा असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ आणि शरीरातील ऊतींचा नाश यामुळे होणारा आजार आहे.
- ल्युकेमिया हा रक्त कर्करोगाचा एक प्रकार आहे जो शरीरातील रक्त-उत्पादक ऊतींचा कर्करोग आहे.
- ल्युकेमियाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्या उपचारासाठीही विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यापैकी एक CAR-T सेल थेरपी आहे.
या थेरेपीची ६पैकी ५ रुग्णांवर यशस्वी उपचार
- आणखी एक ८ वर्षांचा मुलगा, ज्याला सहा महिन्यांपूर्वी CAR-T चे इंजेक्शन दिले होते, त्याचा देखील कर्करोग बरा झाला आहे.
- सहा रुग्णांपैकी फक्त एकाने CAR-T पेशींना प्रतिसाद दिला नाही.
- आयआयबी-टीएमसी टीम दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी तयारी करत आहे.
- ज्यामध्ये ५० रुग्णांना CAR-T सेल दिल्या जातील.