मुक्तपीठ टीम
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींच्या संपत्तीत यावर्षी २८.८ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार अदानींची एकूण संपत्ती ६२.६ अब्ज डॉलर आहे. त्यामुळे गौतमी अदानी हे आशियातले दुसऱ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेत. जगभरातल्या श्रीमंतांच्या यादीत ते आता १७व्या नंबरवर पोहोचलेत. आशिया खंडामध्ये मुकेश अंबानी आणि चीनच्या झोंग शैनशैन यांच्या खालोखाल अदानी आता तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महाश्रीमंतांच्या यादीत अदानींचा कितवा नंबर?
जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी १३व्या आणि शैनशैन १६व्या स्थानी आहेत. शैनशैन यांच्या संपत्तीत यावर्षी १४.१ अब्ज डॉलरची घट झालीय. त्यांची संपत्ती ६४.१ अब्ज डॉलर आहे. म्हणजे त्यांची संपत्ती अदानींच्या तुलनेत १.५ अब्ज डॉलरने अधिक आहे. अदानी यांच्या कंपन्यांमधली शेअर्सची तेजी पाहता अदानी काही दिवसातच शैनशैन यांना पिछाडीवर टाकू शकतात.
मुकेश अंबानी १३व्या स्थानी
भारतातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ७३.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १३व्या स्थानावर आहेत. अदानी त्यांच्या मागोमाग चौथ्या स्थानावर आहेत. यावर्षी अंबानींच्या संपत्तीत ३.०२ अब्ज डॉलरची घट झालीय. अंबानींचे शेअर्स कोसळल्यामुळे ते टॉप १०मधून बाहेर पडलेत.
बेजोस अव्वल
ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार ऍमेझॉनचे जेफ बेजोस हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. त्यांची संपत्ती १८६ अब्ज डॉलर इतकी आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क १७३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत.
झुकरबर्ग पाचव्या स्थानी
मायक्रोसॉफ्टचे कोफाऊंडर बिल गेट्स १४५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या स्थानी आहेत. तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग ११४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या स्थानी आहेत.
अमेरिकेचं वर्चस्व
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट हे १११ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ६व्या स्थानी, अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि इंटरनेट उद्योजक लॅरी पेज १०५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह सातव्या स्थानी, गुगलचे कोफाऊंडर सेर्गे ब्रीन १०२ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह आठव्या स्थानी, त्यांचे सहकारी लॅरी एलिसन ९३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह नवव्या स्थानी, अमेरिकन व्यापारी, गुंतवणूकदार स्टीव्ह बाल्मर ८९.५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दहाव्या स्थानी आहेत. जगभरातल्या टॉप १० श्रीमंतांमध्ये ९ अमेरिकन्सचा समावेश आहे.