मुक्तपीठ टीम
आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची २०२१ मधली कमाई ही जगातील टॉप तीन अब्जाधीश एलॉन मस्क, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या एकू संपत्तीपेक्षा जास्त आहे. गौतम अदानी यांनी गेल्या एका वर्षात सर्वाधिक संपत्ती कमावली आहे. M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टनुसार, अदानींनी गेल्या वर्षी दर आठवड्याला आपल्या संपत्तीत ६ हजार कोटी रुपयांची भर घातली. यादरम्यान त्यांच्या संपत्तीत ४९ अब्ज डॉलर्स वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ८१ अब्ज डॉलर्स आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या मागे आहेत.
१०३ अब्ज डॉलर संपत्ती असलेले अंबानी हे २०२२ M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टमधील टॉप १० मध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय आहेत. गेल्या वर्षभरात अंबानींच्या संपत्तीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर या हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२२ मध्ये प्रथमच सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ७.६ अब्ज डॉलर आहे.
भारतात एकूण २१५ अब्जाधीश असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा अब्जाधीश असलेला देश आहे. चीनमध्ये ११३३ आणि अमेरिकेत ७१६ अब्जाधीश आहेत. अहवालानुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या दर पाच वर्षांनी दुप्पट होत आहे. भारतीय अब्जाधीशांनी गेल्या १० वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये सुमारे ७०० अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. ही रक्कम स्वित्झर्लंडच्या जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या जीडीपी च्या दुप्पट आहे.