जगदिश ओहोळ / व्हाअभिव्यक्त!
एकाच राजकीय पक्षाकडून सलग ११ वेळा आमदार झालेले आबा यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली पण आबांना त्या गोष्टीच कधी काय विशेष कौतुक वा गर्व वाटल्याच दिसलं नाही. गणपतराव आबा हे कायम जमिनीवर आणि जनतेच्या मनात राहणारे व्यक्तीमत्व होते. आजच्या या राजकीय घोडदौड असणाऱ्या जमान्यात एखादा नेता सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात, जो मंत्रिपद देईल त्याच्याशी दोस्त , आशा काळात सलग ११ वेळा एकाच पक्षाकडून आमदार होणारे व पक्षाशी एकनिष्ठ असणारे गणपत आबा हे अतुलनीय उदाहरण आहे. आणि हा आदर्श पुढच्या कैक पिढ्याना राहणार आहे.
पाच वर्षात एखादा आमदार इतके घोटाळे अन कारनामे करतो की घोटाळ्याचे आकडे ही जनतेला मोजता येत नाहीत, आबा ५५ वर्ष आमदार राहिले पण ना असा कोणता घोटाळा, ना मतदारांचा विश्वासघात! जे आहे ते स्पष्ट आणि निर्मळ.!
एवढंच नाही तर आजकाल आपल्याच हयातीत आपल्या मुलां मुलींच राजकीय करिअर करण्याकडे नेत्याचा मोठा कल आहे पण आबांनी तो घराणेशाहीचा विचार कधीच केला नाही व जनतेवर आपला वारस लादला नाही. त्यांनी शब्द टाकून खुल आवाहन केलं असतं तरी जनतेने सहज ते सांगतील तो उमेदवार निवडून दिला असता पण आबांनी घराणेशाही नाकारली. यामुळेच शेवटच्या काळात आबांच्या घरात काही कलह ही निर्माण झाले. आमच्यासाठी काय के? ना कारखाने, ना पैसा, ना आमदारकी असा आरोप त्यांच्यावर त्यांच्याच चिरंजीवानी केला आणि त्या वेदना आबांना सोसाव्या लागल्या. याचीच दुसरी बाजू ही आहे की ११ वेळा आमदार झालेल्या आबांनी आपलं घर भरलं नाही तर खरा जनसेवक म्हणून काम केलं.!
आज आमदार गणपतराव (आबा) देशमुख यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज मुख्यमंत्र्यांचं जेवढं वय आहे, त्यांच्या जवळपास काळ तर आबांच विधिमंडळातील काम आहे.
सण २०१५ मध्ये आमदार निवासात त्यांच्या निवासस्थानी त्यांना जवळून भेटण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा व या विद्यापीठाला समजून घेण्याचा योग माझ्या आयुष्यात आला.
त्या भेटीत ख्यालीखुशाली झाल्यावर उत्सुकतेने मी आबांना म्हणालो,
‘आबा तुमची गिनेज बुक आँफ वर्ल्ड रेकाँर्ड मध्ये नोंद होतेय..’ असं मी म्हणत असतानाच ते वाक्य मध्येच तोडत, आबा म्हणाले “माझं जनतेच्या मनातलं स्थान, हीच माझी सगळी रेकाँर्ड..”
तुमच्या या अखंड यशाचं रहस्य काय.? असं विचारल्यावर किंचित स्मित हास्य करत आबा म्हणतात.. ‘विश्वास’ माझ्या तालुक्यातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्याला मी कधीच तडा जाऊ दिला नाही. माझं आणि मतदारांच एक नातं आहे, आणि मी ते राजकारणाच्या पलीकडे जपतो.. ते नातं आहे विश्वासाचं.’
आबांच्या या बोलण्यातून मला बरबटलेल्या राजकारणातील एक निष्कलंक, संयमी, आभाळाएवढं व्यक्तिमत्व दिसले..
ते आबांच्या रुपाने..!
असा आमदार पुन्हा होणे नाही.
आबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
(जगदिश ओहोळ हे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते आहेत.)