मुक्तपीठ टीम
अखेर जो अपेक्षित होता तो चांगला मोठा निर्णय राज्यातील आघाडी सरकारने घेतला आहे. राज्यात सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रानं राज्य सरकारवर सोपवलेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवा वर्गाला महाराष्ट्रात मोफतच लस मिळणार आहे. मात्र, लसींचा तुटवडा आहे. नव्याने लसी मिळवून लसीकरणाचे नियोजन केले जाईल. त्यामुळे एक मेपासून युवावर्गाला लस देण्यात येणार नाही, त्यासाठी त्यांना थांबावं लागेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच १८ ते ४४ वर्षांच्या वयोगटातील युवा नागरिकांचे वयांनुसार वर्गीकरण करुन लसीकरणाचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचा उद्रेक सुरुच असताना युवावर्गाच्या लसीकरणाचा मुद्दा महत्वाचा झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याच वर्गाला कोरोनाचा मोठा फटका दिसत आहे.
महाराष्ट्रात युवा वर्गाचं लसीकरण
- वय वर्ष १८ ते ४४ अशा वयोगटातील युवा नागरिकांना लसीकरण केले जाईल.
- एक मेपासून युवावर्गाला लस देण्यात येणार नाही, त्यासाठी त्यांना थांबावं लागेल.
- लसीकरणासाठी जसं ४५ वर्षांवरील नागरिकांना को-विन अॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी लागते, तशीच १८ वर्षांवरील नागरिकांनाही तशीच नोंदणी करावी लागेल.
- १८ ते ४४ वर्षांच्या वयोगटातील युवा नागरिकांचे वयांनुसार वर्गीकरण करुन लसीकरणाचे नियोजन केले जाईल.
- या वयोगटात राज्यात ५ कोटी ७१ लाखांहून अधिक नागरिक आहेत.
- त्यांच्यासाठी १२ कोटींच्या लसींची आवश्यकता असणार आहे.
- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या लसीकरणासाठी साडे सहा हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
- खासगी रुग्णालयातील लसीकरणासाठी मात्र शुल्क द्यावे लागेल.