मुक्तपीठ टीम
सध्या आपल्या देशात कोरोना महामारीमुळे परिस्थिती भीषण होत चालली आहे. संसर्ग साखळी तोडण्यासाठी संचारबंदी, लॉकडाऊनसारखे प्रतिबंधात्मक उपाय केले जात असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. सरकारने शिवभोजन मोफत देण्यास सुरुवात केली असली तरी ते प्रत्येकाला मिळणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे खासगी दातृत्वाचीही गरज आहे. नेमके हेच ओळखून कोल्हापूरमधील हॉटेल अमृतचे मालक विद्याधर पाटील यांनी आपुलकीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या हॉटेलमधून गरजूंसाठी मोफत जेवण पुरवणे सुरु केले आहे.
हे हॉटेल कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये आहे. महाराष्ट्र शासनाकडून शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत आहे, तसेच आपणही का करु त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या व्यावसायिकाने यावर हातभार लावण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे १५ दिवसांची संचारबंदी जाहीर केलेली आहे. यामुळे कोल्हापूरचे हॉटेल व्यावसायिक विद्याधर पाटील यांनी आपल्या हॉटेलमध्ये जेवण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, प्रशासनाच्या कामाला आपणसुद्धा काहीतरी हातभार लावावा म्हणून हॉटेल व्यावसायिक गरजूंना मोफत जेवण देत आहेत.
कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेपासूनच विद्याधर पाटील अस्वस्थ झाले. हातावर पोट असणारे अनेक गरजू त्यांना सभोताली दिसत असत, संचारबंदीत सर्व कामे बंद झाल्यावर अशांचे काय होणार, या विचारातून त्यांना अस्वस्थता आली होती. त्यातूनच त्यांनी मनाशी एक निर्धार केला. किमान आपल्या संपर्कातील, सभोतालच्या कुणाला उपाशी राहू द्यायचं नाही, या जाणीवेतून त्यांनी कोरोना संकटात संचारबंदी असेपर्यंत मोफत जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला.
विद्याधर पाटील मुळचे हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील आहेत. हुपरीत त्यांनी छोटंसं हॉटेल सुरु केलं. त्यांच्या सचोटीमुळे हॉटेल अमृत व्यवस्थित चालू लागले. आता संचारबंदीमुळे त्यांनाही व्यावसायिक फटका बसणार आहे. पण कोणी उपाशी राहू नये, हे आपले मन सांगते. त्यामुळेच तुमच्या संपर्कातील गरजूंची माहिती द्या, त्यांनाही आम्ही घरपोच जेवण देऊ, असेही ते आपुलकीनं सांगता. तसेच आता पैसा नाही कमवला तरी नंतर कमवेन. आता माणसांना जगवणे महत्वाचे, असे ते सांगतात. यातून दिसतं ते त्यांचे कुबेराच्या खजिन्यालाही छोटं ठरवेल असं मोठं मन!
पाहा व्हिडीओ: