मुक्तपीठ टीम
शिवडीतील रेल्वे क्रॉसिंगच्या जागी उभारला जाणारा उड्डाणपूल खूपच उपयोगी ठरणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाची किंमत १० कोटी रुपये आहे.
हार्बर लाइनवर सध्या तीन क्रॉसिंग गेट आहेत. स्टेशनच्या पश्चिमेपासून पूर्वेकडे वाहतुकीसाठी शिवडी, चुनाभट्टी व कुर्ला येथे क्रॉसिंग गेट आहेत. रेल्वेचे वेळापत्रक कायम राखण्यासाठी आवश्यक समन्वयाचे स्पष्टीकरण देताना रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “हार्बर मार्गावर दररोज एकूण १७ गाड्या धावतात. मध्य रेल्वेच्या त्याच्या उपनगरीय मार्गावरून ४५ लाख प्रवासी प्रवास करतात तर १३ ते १५ लाख हार्बर मार्गाने प्रवास करतात. प्रति मिनिट हार्बर लाईनने सरासरी १००० प्रवासी प्रवास करतात. गेट सहा ते आठ मिनिटांसाठी खुला ठेवला जातो. परंतु, कधीकधी बम्पर-टू बंपर वाहतुकीमुळे गेट १० मिनिटे खुले ठेवावे लागते. परिणामी लोकल गाड्या धावण्यास उशीर होतो.”
एल्फिन्स्टन-परळ येथे रोड ओव्हरब्रिज तयार करण्यासाठी महारेल यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाबरोबर सामंजस्य करार केला आहे. तसेच शिवडी उड्डाणपुलाचे कामही महारेलच करणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडला जोडणारा रस्ताही हा उड्डाणपूल सहजतेने उपलब्ध करुन देईल. पहिल्या पाच वर्षांत प्रस्तावित हार्बर लिंकचा वापर ५० ते ६० हजार वाहने करतील. दरवर्षी ती संख्या किमान ५ ट्कके वाढेल. गाड्यांच्या वाढत्या रेल्वे क्रॉसिंगचे गेट बंद होण्यास जास्त वेळ लागेल. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होईल, त्यामुळे हा नवा उड्डाणपूल बांधणे गरजेचं मानलं जात आहे.
पाहा व्हिडीओ: