मुक्तपीठ टीम
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीला पूर हा नेहमीच ठरलेला. त्याचा फटका बसतोच बसतो. एकीकडे सभोतालच्या जमिनीची धूप तर दुसरीकडे पिकांची विल्हेवाट असे दुहेरी संकट या नेहमीच येणाऱ्या पुरामुळे ओढवते. मात्र, आता तेथील शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात तरंगत्या शेतीचे प्रयोग सुरु केले आहेत. त्यामुळे त्यांना बसणारा पुराचा शेतीला बसणारा फटका तर कमी झालाच आहे, पण गेली काही वर्षे घेणं शक्य नसलेली भाज्यांची पिकही आता घेणं शक्य झालं आहे.
ब्रह्मपुत्रा उपकार आणि अपकार!
- ब्रह्मपुत्रा नदी ही आसामासाठी जीवनदायीनी उपकारकर्ती आहे, पण तिला पूर येतो (आणि तो अनेकदा येतोच येतो!) तेव्हा ती अपकारकर्तीही होते.
- होत्याचे नव्हते करते. आपल्या मराठवाड्यात जशी आताच्या अतिवृष्टीनं जमीन खरवडली तसं तिथं नेहमीच होते.
- त्यामुळे तेथे पूर-प्रतिरोधक लाल तांदळाच्या वाणाचा उपयोग करून घेतलेलं बाओ भाताचं पीक हाती येतं.
- पण ते फक्त कसं बसं जगण्यापुरतं उपयोगी पडतं.
- त्यासोबत आवश्यक असणाऱ्या भाज्या कष्टानं उगवल्या तरी पुराच्या पाण्यात वाहून जात असतात.
त्यामुळेच आता तिथं नवं पीक आणि नवी पीक पद्धती रुजवली जात आहे. थर्ड पोलसारख्या स्थानिक माध्यमांनी तेथे सुरु असणाऱ्या शेतीतील प्रयोगांवर खूप चांगली माहिती दिली आहे. त्यानंतर राष्ट्रीय माध्यमांचेही तेथे लक्ष गेले.
तरंगत्या शेतीचे प्रयोग
- आसाममधील माजुला बेटावर सुमारे ९ हजार २७० हेक्टर जमीन लागवड केली जाते.
- हजारो लोक त्यावर अवलंबून असतात.
- पण सततच्या पुरामुळे तिथं बिकट परिस्थिती ओढवली आहे.
- साउथ एशियन फोरम फॉर एन्व्हायर्नमेंट या शाश्वत विकासाला पुढे नेण्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं तिथं २०१७पासून तरंगत शेती सुरू केली.
कशी होते तरंगती शेती?
- सुरुवातीला हायड्रोपोनिक्सचा अवलंब केला.
- या तंत्रात वनस्पती जमिनीऐवजी पोषक तत्वांनी युक्त पाण्यात वाढवल्या जातात.
- ही एक अशी शेतीची पद्धत आहे ज्यात लागवडीसाठी फ्लोटिंग राफ्ट्सचा वापर केला जातो.
- बांबूपासून बनवलेल्या तराफ्यांवर भाज्या पाण्याने भिजलेल्या, नॉन-बायोडिग्रेडेबल स्पंज सामग्रीमध्ये वाढवल्या जातात.
- या पद्धतीत काही नुकसान होत असल्याने साऊथ एशियन फोरम फॉर एन्व्हायर्नमेंटने बांबूपासून बनवलेले तराफे वापरण्यास सुरुवात केली.
- ड्रमचा वापर करून हे तराफे तरंगत ठेवले आहेत.
- आता त्यावर भाज्यांचे पीक घेतले जात आहे.
- बांबूमुळे हे तराफे टिकतात. सडत नाही. भाज्यांची पीकंही चांगली येतात.
एकीकडे शेतीतून भाज्याही मिळू लागलेल्या असतानाच दुसरीकडे पुरामुळे होणारे शेती पीकांचे नुकसानही टळले आहे.
पाहा व्हिडीओ: