मुक्तपीठ टीम
संपूर्ण जगातच अनेक पालकांकडून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. वाचन हा आपला चांगला मित्र असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय-अमेरिकन वंशाच्या पाच वर्षाच्या किआरा कौरची पुस्ताकंसोबतची मैत्री इतकी चांगली झाली की, तिच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली. किआराने न थांबता १०५ मिनिटे म्हणजे पावणे दोन तासात ३६ पुस्तके वाचली. किआरा ही सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्यास आहे.
जवळपास दोन तासांच्या कालावधीत इतकी पुस्तके वाचण्याचा विक्रम लंडन वर्ल्ड बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. किआराला अतिशय लहान वयात वाचनाची सवय लागली होती. मग ती प्रवासात असो की, आराम करत पुस्तके कायम वाचत होती.
किआराचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न
किआराला विचारले तर ती सांगते, पुस्तके वाचणे हा आनंददायी अनुभव आहे. तु्म्ही पुस्तके कुठेही वाचू शकता. विविध रंगीत छायाचित्रे असलेली आणि मोठ्या अक्षरात छापलेली पुस्तके आवडत असल्याचे तिने सांगितले. सिंड्रेला, एलिस इन वंडरलँड्स आदी पुस्तके आवडत असल्याचे किआराने सांगितले.
किआराला वाचनाची सवय तिच्या आजोबांमुळे लागली. किआराच्या आईने सांगितले की, किआरा बराच वेळ व्हॉट्सअॅपवर आजोबांकडून गोष्ट ऐकत असते. त्याचा किआरावर चांगला परिणाम झाला. मोठे होऊन डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. किआराने जागतिक विक्रमात नोंदवल्यामुळे किआराचे पालक खूश आहेत.
पाहा व्हिडीओ: