मुक्तपीठ टीम
पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या उत्तम कामगिरीची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी देशाच्या विविध भागात पाच ‘दिव्यांग क्रीडा केंद्र’ स्थापन करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्यामुळे दिव्यांगांना त्यांच्यातील क्रीडा प्रतिभेला आकार देत तळपवण्याची संधी मिळणार आहे.
देशातील दिव्यांगांमधील खेळाबद्दलची आवड वाढत आहे. तेवढ्या सुविधा नसतानाही भारतीय दिव्यांग क्रीडापटूंनी पॅराऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तिची दखल घेत मंत्रालयाने देशाच्या विविध भागात पाच ‘दिव्यांग क्रीडा केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा सुरु करण्यासाठी अहमदाबाद हे एक शहर निश्चित करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या योजनेंतर्गत ‘दिव्यांगजनांना’ सहाय्य आणि सहाय्यक उपकरणांच्या वितरणासाठी आयोजित ‘सामाजिक सक्षमीकरण शिबिराला’ आभासी माध्यमातून संबोधित करताना गेहलोत यांनी माहिती दिली की, शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने गुजरातला आठ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून त्याचा लाभ दोन हजार ८०८ लाभार्थ्यांना होत आहे.
सुगम्य भारत अभियानांतर्गत ७०९ रेल्वे स्थानके, १० हजार १७५ बस स्थानके आणि ६८३ संकेतस्थळांचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील सिहोर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन केंद्राचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे.