मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. तशी लाट खरंच आली तर तिचा सामना करण्यासाठी मुंबई आता आणखी सज्ज होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली तरीही मुंबई मनपानं तयारी थांबवलेली नाही. कोरोनाबाधितांच्या उपचारातील ऑक्सिजनचं महत्व लक्षात घेऊन मुंबईतील पाच रुग्णालयांमध्ये पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुंबईतील पाच नवे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
• नेहरू सायन्स सेंटर, वरळी
• वांद्रे भाभा रुग्णालय, वांद्रे पश्चिम
• राजावाडी रुग्णालय, घाटकोपर
• कूपर रुग्णालय, विलेपार्ले पश्चिम
• कस्तुरबा रुग्णालय, महालक्ष्मी
हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प
• वातावरणातील हवा शोषून त्याद्वारे वैद्यकीय प्राणवायू निर्मिती करणाऱ्या (पीएसए) तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
• कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) माध्यमातून हे सर्व संयंत्र उपलब्ध झाले आहेत.
• मेसर्स आरती इंडस्ट्रीज, मेसर्स घारडा केमिकल्स, मेसर्स बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, मेसर्स सारेक्स फाऊंडेशन, मेसर्स अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, मेसर्स डी डेकोर होम फॅब्रिक्ज प्रा. लि. आणि मेसर्स मारवाह स्टील प्रा. लिमिटेड या सात दात्यांनी मिळून सीएसआर अंतर्गत हे संयंत्र उभारण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटावर मात करताना ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने मुंबईत विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पाच रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण आज होत आहे. अशा पद्धतीने सर्वजण एकत्र आलो तर आपण कोणत्याही संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबई आणि लाटांचा कायमचा संबंध आहे. एक लाट गेली की दुसऱ्याची तयारी करावी लागते. कोरोना काळातही सर्वांनीच युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे काम केले. कोरोना काळात मुंबई मॉडेलचे जगभर कौतुक झाले. पण हे श्रेय माझे नसून प्रत्यक्ष काम करणाऱ्या आपल्या सर्वांचे आहे. वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारुन बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्वयंपूर्णतेकडे होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद आहे, असे कौतुकाचे उद्गार त्यांनी काढले.
ऑक्सिजन अभावी मुंबईतील सुमारे १५० रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्या सुमारास राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने आज नवीन पाच संयंत्रे सुरू झाली आहेत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, संबंधित सर्व यंत्रणांसह सीएसआर निधीतून मदत केलेल्या कंपन्यांचेही आभार मानले. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याऐवजी आपले काम बोलले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कंपन्यांची मोलाची मदत- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्वतः कोरोनाग्रस्त असतानाची आठवण सांगितली. ठाकरे म्हणाले, ४ एप्रिल रोजी मुंबईत सुमारे ११ हजार रूग्ण होते, परंतु ऑक्सिजनच्या योग्य व्यवस्थापनामुळे सुदैवाने कोणीही दगावले नाही, याचे श्रेय महापालिकेची यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणेला आहे. ऑक्सिजन बाबत आत्मनिर्भर होताना सीएसआर निधीतून मदत देण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तात्काळ पुढे येऊन मुंबईतील पाच आणि अन्य दोन अशा सात ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारल्याबद्दल ठाकरे यांनी कंपन्यांचे आभार मानले. ही मोलाची मदत असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन निर्मिती हा मुंबईसाठी दिलासा- महापौर
मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे पाठबळ आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने नवीन पाच ऑक्सिजन निर्मिती संयंत्र सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून यामुळे मुंबईतील रुग्णालयांना चांगली रुग्णसेवा करून दिलासा देता येईल असा विश्वास व्यक्त केला.
आयुक्त चहल यांनी कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला थोपविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्षमपणे तयार असल्याचे यावेळी सांगितले.
या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यास जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) कृष्णा पेरेकर, कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह विविध मान्यवर आणि संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.