मुक्तपीठ टीम
दरवर्षी मुंबईतील नालेसफाईंवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये होणारे वाद, सफाई चांगली झाली असल्याचा महापालिका आयुक्तांचा ठाम दावा, त्यावरुनही विरोधी पक्ष प्रशासनाची लक्तरे काढत असल्यामुळे पालिकेची होणारी निंदा याला रोखण्याचा प्रयत्न म्हणून यावेळी नालेसफाईची कामे दोन शिफ्टमध्ये निर्धारित वेळेत पूर्ण करा, असे सक्त आदेश प्रशासक इक्बाल चहल सिंग यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी, कंत्राटदारांना बजावले आहेत.
बुधवारी, १३ एप्रिल रोजी भाजपचे आमदार आशिष शेलार आणि भाजपाच्या माजी नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत यंदाच्या नालेसफाईवरुन प्रशासकांवर टीकेची झोड उठवली होती. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकांनी गुरुवारी पर्जन्य जलवाहिन्यांशी संबंधित अधिका-यांसह पूर्व आणि पश्चिम उपनगरे आणि शहर विभागांत नालेसफाईची सखोल पाहणी केली.
मुंबई पालिका क्षेत्रात सुमारे ३४० किलोमीटर लांबीचे मोठे व छोट्या नाले आहेत. त्याच्या सफाईंसाठी अतिरिक्त यंत्रसामुग्रीही वापरा, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी ‘ग्राऊंड’ वर आलेले हे पहिलेच आयुक्त – प्रशासक आहेत.
नालेसफाईच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने भरारी पथके तैनात करण्याचा निर्णय, सफाईनंतर काढलेला गाळ उचलण्यापूर्वी व निर्धारित ठिकाणी गाळ टाकण्यापूर्वी, अशा दोन्ही वेळी गाळाचे वजन करण्यासह दोन्ही वेळी व्हिडीओ छायाचित्रणाचेही निर्देश प्रशासकांनी पालिकेच्या संबंधित अधिका-यांना दिले. पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार सफाईची पावसाळापूर्व कामे ३१ मे २२ पूर्ण करण्याचे लेखी आदेश दिले असले तरी १५ मे २२ पूर्वी पूर्ण करण्याचे ‘लक्ष्य’ ठेवावे, अशा सक्त सूचना त्यांनी संबंधित खात्याला दिल्या.
चहल यांनी सर्वप्रथम मिठी नदीतील , ‘बीकेसी कनेक्टर ब्रिज’जवळच्या ‘कॅनरा बँक’ कार्यालयासमोरील मिठी नदी व वाकोला नदी आणि ‘अंबानी’जवळील मिठी नदीच्या पात्रातील, ‘वांद्रे टर्मिनस’ नजीकच्या वाशी नाका नाल्यातील आधुनिक यंत्राने सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, संबंधित उपायुक्त उल्हास महाले, संबंधित अधिकारी उपस्थित होते.