मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील पाचव्या पाणबुडीची पहिली सागरी चाचणी नुकतीच यशस्वीपणे पार पडली. नोव्हेंबर २०२० मध्ये एमडीएल अर्थात माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेड या कंपनीच्या कान्होजी आंग्रे बंदरात या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले होते. सेवेत समाविष्ट झाल्यानंतर या पाणबुडीचे ‘वागीर’ असे नामकरण करण्यात येणार आहे.
कोरोना महामारीचे संकट असताना देखील एमडीएल कंपनीने वर्ष २०२१ मध्ये प्रोजेक्ट-७५ अंतर्गत दोन पाणबुड्यांचे जलावतरण केले. आणि कंपनीने आता पाचव्या पाणबुडीची सागरी चाचणी पूर्ण करण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यानंतर या पाणबुडीमध्ये असलेल्या प्रॉपल्शन यंत्रणा, शस्त्रास्त्रे आणि संवेदकांसह सर्व यंत्रणांची समुद्रामध्ये अत्यंत कठोर चाचणी घेतली जाईल. या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करून घेतली जाईल.