मुक्तपीठ टीम
आता पर्यंत आपण अनेक प्रकारच्या शेतीबद्दल ऐकलं असेल, पण कोल्हापूरात चक्क गॅस पिकणार आहे. गवतापासून गॅस निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात असणाऱ्या सांबरे येथे राबवण्यात येत आहे. हे ऐकायला जरी नवलच वाटत असले तरी ही बातमी खरी आहे. शेतकऱ्यांकडून १ हजार रुपये टन हत्ती गवताची खरेदी करून त्यापासून प्रतिदिन १ हजार टन गॅसनिर्मिती करण्यात येणार आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरींचे अशा प्रकारच्या प्रकल्प निर्मितीचे स्वप्न होते. ते स्वप्न आता येथे साकार होत आहे. २६ जानेवारी २०२२ पर्यंत कोणत्याही स्थितीत गवतापासून गॅस उत्पादन सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. मुंबईच्या मीरा क्लीन फ्युएल्स ( MCL) या मुख्य कंपनीकडून प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. तेथे सीएनजी, पीएनजी गॅस तसेच बायो फर्टिलायझर तयार केला जाणार आहे. तो गॅस विकण्यासाठी महाराष्ट्रात ८८ सीएनजी पंपांची परवानगी मिळाली आहे. तेथे हा गॅस पुरवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहेच पण देशाचे परदेशावरील गॅससाठीचे ४० टक्के परावलंबित्व कमी होण्यासही मदत मिळेल, अशी माहिती व्हेंचुरिक एनर्जी प्रा. लि.चे मुख्य प्रवर्तक सुधीर फडके यांनी माध्यमांना दिली आहे.
शेतकरी आणि पर्यावरणाला लाभ…गवतापासून गॅस!
• शेतकऱ्यांची गडहिंग्लज फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
• या गडहिंग्लज फार्मर कंपनीचे सध्या २४०० शेतकरी सभासद आहेत.
• अजून १० हजार पर्यंत सभासद वाढविण्यात येणार आहेत.
• यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून ५०० रूपये घेतले जात आहेत.
• यापैकी २५० रुपये शेअर्स तर २५० रुपयांची खते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.
• शेतकऱ्यांनी गवताचे उत्पादन करायचे आहे.
• सुपर नेपिअर म्हणून विकसित वाण यासाठी वापरण्यात येईल.
• त्याचे बियाणे कंपनीच पुरवणार आहेत.
• या परिसरात हे गवत चांगले वाढते आणि त्याचा खर्च कमी नसतो.
• ७५ दिवसात एकरी ४० टनाचे उत्पादन होते.
• हे गवत शेतकऱ्यांकडून कंपनी १ हजार टनाप्रमाणे खरेदी करणार आहे.
• एकराला वर्षाला दीड लाख अत्यल्प खर्चात उत्पादन मिळते.
• ऊसाचा विचार केला तर एकरी ४० टनाचे १ लाख २० हजार रुपये मिळतात. पण सर्व खर्च वजा जाता निम्मे पण उरत नसल्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांना जास्त वरदायी आहे.
• या गवताची कापणी व वाहतूकही कंपनीच करणार आहे.
पाहा व्हिडीओ: