मुक्तपीठ टीम
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील इर्ला भागात एका मोठ्या मॉलला आज सकाळी आग लागली. सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. मॉलच्या बाहेरील काचा फोडून अग्निशमन दलाने आत कोंडलेला धूर बाहेर काढत आगीशी झुंज देणे सुरु केले आहे.
स्थानिक नगरसेविका सुनिता मेहता आणि भाजपाचे स्थानिक नेते राजेश मेहता यांनी तात्काळ प्राइम मॉलजवळ पोहचून अग्निशमन दल, पोलीस यांच्यांशी समन्वयात सहकार्य केले. राजेश मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त के पश्चिम पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त जयप्रकाश भोसले, जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.
प्राइम मॉल हा पश्चिम उपनगरातील मोठ्या मॉलपैकी एक आहे. मोबाइल स्मार्ट फोन आणि अॅक्सेसरीजची तसेच तयार कपड्यांची अनेक दुकाने असल्याने मॉल नेहमी गजबजलेला असतो. आग सकाळी लागली तेव्हा मॉलमध्ये फक्त कर्मचारी येवू लागले होते. ग्राहकांची गर्दी नव्हती. त्यामुळे आत असलेल्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.
अग्निशमन दलाचे जवान आताही आगीवर पूर्ण विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आताही काही ठिकाणी धूर येत असल्याने अग्निशमन ऑपरेशन सुरु आहे.
जवळच्या पेट्रोल पंपामुळे अधिक दक्षता
प्राइम मॉलच्या जवळच स्वामी विवेकानंद मार्गावर पेट्रोल पंप आहे. त्यामुळे अग्निशमन दल, मनपा आणि पोलिसांकडून खास दक्षता घेतली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत आग पसरू नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे.