मुक्तपीठ टीम
शिक्षकांच्या पेशाला काळिमा फासण्याची घटना घडली आहे. एका केमिस्ट्री शिक्षिकेने तिच्याच १६ वर्षाच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले. ती त्याला अश्लील मेसेज पाठवत आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवत असे. त्यातून तो विद्यार्थी तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. परंतु विद्यार्थ्याला पुढे तिच्या वेगळ्या संबंधांची माहिती मिळताच त्याने आत्महत्या केली. प्रसंगी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्याने असे लिहिले आहे की शिक्षिका गरज पडल्यास त्याचा फायदा घेत असे. तिला पाहिजे तेव्हा नंबर ब्लॉक करायची. या नोटच्या आधारे पोलिसांनी महिला शिक्षिकेस अटक केली आहे.
छत्तीसगडमधील बिलासपूरमधील खासगी शाळेत ती शिक्षिका रसायन शास्त्राची शिक्षिका होती. याच शाळेत आत्महत्या केलेला विद्यार्थीही शिकत होता. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार शिक्षिकेने विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पुढे शिक्षिकेचे शाळेतीलच स्टाफ मेंबरशी अफेअर सुरू असल्याचे समजले तेव्हा तो विद्यार्थी अस्वस्थ झाला.
विद्यार्थ्याने आत्महत्येचा व्हिडिओ बनवून तो शेड्यूल करून पाठवला.
त्या विद्यार्थ्याने शिक्षिकेशी बर्याच वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने नंबर ब्लॉक केला. सुसाईड नोटमध्येही विद्यार्थ्याने याचा उल्लेख केला आहे. त्रस्त विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने नोट लिहून आत्महत्येचा व्हिडिओही तयार केला होता, जो त्याने शेड्यूल केला आणि आपल्या मित्रांना पाठविला. सद्यस्थितीत पोलिसांनी हा व्हिडिओ ताब्यात घेतला असून तो सार्वजनिक होण्यास बंदी घातली आहे.
शिक्षिकेवर नजर ठेवण्यासाठी ‘तो’ हॅकर झाला!
विद्यार्थ्याला टेकनॉलॉजीची चांगली माहिती होती. त्यांनी कोड भाषेत सुसाइड नोट लिहिली. ते डीकोड करण्यास पोलिसांना दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला. शिक्षिकेवर नजर ठेवण्यासाठी तिचे मोबाईल, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया अकाउंट हॅक केले. असे सांगितले जात आहे की काही दिवसांपूर्वी शिक्षिकेला जेव्हा हे समजले तेव्हा ती १८ मार्च रोजी विद्यार्थ्याच्या घरी गेली. शिक्षिका घराबाहेर पडल्यानंतर अर्ध्या तासाने विद्यार्थ्याने आत्महत्या केली. दुसर्या दिवशी म्हणजेच १९ मार्च रोजी त्याच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना याची माहिती मिळाली.
– मुक्तपीठ भूमिका –
शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यांचं शारीरीक शोषण केले. तिला शिक्षा होईलच. पण तो तर गेला. काय मिळवलं? विद्यार्थी परिपक्व नसल्यानं तिच्या लैंगिक इच्छेला प्रेम समजला. एकतर्फी प्रेम करू लागला. पुढे तिच्या वागण्याने त्याला स्वाभाविकच धक्का बसला. परंतु तरीही आत्महत्या हा उपाय नाही.
यासाठीच प्रत्येकाने परस्पर संवाद वाढवावा. आपल्यासोबतचे कोणी वेगळे वागू लागले, गप्प राहू लागले तर संवाद साधा. विचित्र वागण्याकडे दुर्लक्ष करू नका. मन कितीही अस्वस्थ झाले तरी एखादी किंवा काही व्यक्ती वाईट वागल्या तरी जगात बरंच काही चांगलंही असते, ते लक्षात ठेवा. वाईटापेक्षा चांगलं जास्तत असतं. ते शोधा. जीवन अनमोल, ते उधळू नका, असं समजवा.
– तुळशीदास भोईटे, संपादक, मुक्तपीठ