मुक्तपीठ टीम
पावसाळी हवा, हवेतील गारवा आणि हातातील कपातील चहासोबत बशीभर मस्त भजी! कुणीही मोहात पडतंच पडतं. मुंबईत पोटातील भुकेला वेळेअभावी भागवण्यासाठी गरमागरम वडापाव आणि दिल्लीत असाल तर समोसा आपलासा वाटतो. पण हे भजी, वडे, समोसे ज्या तेलात तळले जातात. त्या तेलाची गुणवत्ता, दर्जा आपल्याला माहित असतोच असं नाही. काहीवेळा तर घरात आणलेलं महागडं तेलही दर्जेदार असतंच असं नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने आता देशव्यापी खाद्यतेल तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील FDA पथकानेही स्थानिक व नामांकित मोठ्या ब्रँड्सच्या खाद्यतेलाचे नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा ग्राहकांची फसवणूक टळून आरोग्याचा धोका कमी होण्यात होणार आहे.
दैनंदिन जीवनात विविध अन्न पदार्थ बनविण्याकरिता खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सर्व जनतेला चांगल्या दर्जाचे खाद्यतेल मिळावे याकरीता अन्न व औषध प्रशासन नेहमी सतर्क असून नियमितपणे तसेच विशेष मोहिमांमधून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेमार्फत तपासणीकरिता घेण्यात येतात.
त्याच धर्तीवर अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात खाद्यतेलाचे व वनस्पतीचे तसेच बहु स्त्रोत खाद्यतेल Multi-Source Edible Oil) च्या अनुषंगाने सर्वेक्षण मोहीम दि. १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत राबविण्यात येत असून या कालावधीत स्थानिक व नामांकित मोठ्या ब्रँड्सच्या खाद्यतेलाचे नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण करण्यात येणार आहे. बहु स्त्रोत खाद्यतेलाची विक्री पारवाण्याशिवाय करता येत नाही. तथापि ही बाब देखील तपासण्यात येणार आहे. तसेच सुट्या खाद्यतेल विक्रीस प्रतिबंध असून सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत दि. ०४ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे विभागात खाद्यतेलाचे एकूण १६ सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या सर्वेक्षण नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रेत्यांकडून नियमित अन्न नमुने घेऊन कायद्याअंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.