मुक्तपीठ टीम
आंबा म्हटलं की आवडत नाही असं होतच नाही, त्यातही हापूस म्हटलं की चवीचं खाणाऱ्यांसाठी स्वर्गीय अनुभुतीच! मात्र, याच हापूसच्या अतिलोकप्रियतेचा गैरफायदा घेत कर्नाटकासह इतरही ठिकाणचे नकली हापूस ग्राहकांच्या गळी मारले जातात. त्यांची फसवणूक होते. खाल्ल्यानंतर लगेच कळतं पण फसवूणक व्हायची ती होऊनच जाते. त्यामुळेच आता कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी त्यांचा अस्सल हापूस थेट मुंबई ठाण्यातील मॉल्समधून विकणार आहेत. कोकणातील ३५० शेतकरी पहिल्या टप्प्यात या मॉल्स विक्रीस्थेतून थेट मुंबईकर-ठाणेकर खवैयांपर्यंत पोहचतील.
हापूस आंब्याचा ‘लोकल ते ग्लोबल’ ब्रँड विकसित करत शेतकर्यांना व्रिकीसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हाव्यात यासाठी ’ग्लोबल कोकण’ आणि ’कोकण भूमी प्रतिष्ठान’तर्फे गेल्या २० वर्षांपासून विविध संकल्पना राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षी २२ एप्रिल ते १५ मे दरम्यान ’मँगो फ्ली’ (Mango Fleea) उपक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत कोकणच्या शेतातील अस्सल हापूस आंबा थेट मुंबई, ठाण्यातील मॉल्समध्ये विक्रीस उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी, पावस, मालवण, राजापूर, विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्वर आदी भागातील हापूसचे प्रत्येक मॉल्समध्ये १० स्टॉल्स लावण्यात येणार असून खुद्द शेतकरी यांची विक्री करणार आहेत. या माध्यमातून ३५० हून अधिक शेतकर्यांना व्यासपीठ उपलब्ध होणार असून ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेले, कोणतीही भेसळ नसलेले आणि जीआय मानांकन प्राप्त हापूसचा आस्वाद घेता येईल.
”आंबा विक्रीसाठी शेतकर्यांनी बाजारपेठेतील व्यापार्यांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे, त्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, परिश्रमाचा योग्य आर्थिक मोबदला मिळावा या दृष्टीने आम्ही विविध संकल्पना राबवत असतो. आंब्याची ऑनलाईन विक्री, शेतकरी ते थेट ग्राहक या योजनेनंतर या वर्षी शेतकर्यांना शहरातील मॉल्समध्ये आंबा विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.” असे ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले. या संपूर्ण उपक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन, तर सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा पाठिंबा असून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा यांचे सहकार्य लाभले आहे.
‘आय लीफ कनेक्ट’च्या सहकार्याने आयोजित ‘मँगो फ्ली’ अंतर्गत आंब्याची विक्री, मँगो कॅफे आणि सोबत लाईव्ह मनोरंजन…असा परिपूर्ण उपक्रम पार पडणार आहे. ‘रिजनल फूड्स’चे सह संस्थापक आणि सेलिब्रिटी शेफ सनी पावसकर यांनी आंब्यापासून बनवलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांचा यावेळी आस्वाद घेता येईल. ”बदलत्या काळानुसार आंबा महोत्सवाचे रूप बदलत या महोत्सवाला अधिक उत्साहपूर्ण बनवत मनोरंजन, फोटोग्राफी तसेच मँगो कॅफेची जोड देत आगळ्यावेगळ्या वातावरणात साजरा करण्यावर आमचा भर आहे. जेणेकरून सर्व ग्राहकांसाठी हा महोत्सव एक पर्वणी ठरेल.” असे ‘आयलीफ कनेक्ट’चे संस्थापक प्रतिश आंबेकर म्हणाले. येत्या काही दिवसात ‘ग्लोबल कोकण’तर्फे ‘शेतकरी आंबा बाजार’चे महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात येणार असून एकूण २०० स्टॉल्स लावले जातील. मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक आदी महामार्गांवर याचे आयोजन केले जाईल. हे दोन्ही उपक्रम मिळून १०००हून अधिक शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळणार आहे. अहमदाबाद आणि नाशिक महामार्ग येथील आंबा बाजारच्या नियोजनात ‘समृद्ध कोकण शेतकरी संघटना’, ‘जिजाऊ सामाजिक संस्था’चे संस्थापक निलेश सामरे आणि त्यांच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येत आहे.
‘मँगो लीफ’ उपक्रम कुठे आणि कधी?
- कोरम मॉल – ठाणे – २२ ते २४ एप्रिल – दुपारी १२ ते रात्री १०
- आर सिटी मॉल – घाटकोपर – २९, ३० एप्रिल, १ मे – दुपारी ३ ते रात्री १०
- फिनिक्स पलेडिअम मॉल – लोअर परळ -६ ते ८ मे, दुपारी १२ ते रात्री १०
- सिवुड्स सेंट्रल – नवी मुंबई – १३ ते १६ मे
अधिक माहिती – https://www.globalkokan.org/