मुक्तपीठ टीम
आज वांबोरी येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत २ मेगावॅट क्षमतेच्या सौर कृषी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या प्रसंगी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे उपस्थित होत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे (महावितरण) शेतीला वीजपुरवठा करणारे फीडर्स सौर ऊर्जेच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत. या योजनेनुसार महावितरणने केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत सार्वजनिक कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडशी (ईईएसएल) सुमारे ६७९ मेगावॉट इतक्या क्षमतेच्या वीज खरेदीसाठी करार केला आहे. या करारानुसार महावितरणच्या उपकेंद्रांच्या आवारातील मोकळ्या/अतिरिक्त जागेवर ०.५ मेगावॉट ते १० मेगावॉट क्षमतेचे लघु सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
वीज खरेदी करारानुसार या लघुसौर ऊर्जा प्रकल्पांसाठीचे सर्वेक्षण, संरचना, आर्थिक सहाय्य, प्रकल्पाची उभारणी, चाचणी, कार्यान्वयन, परिचालन आणि देखभाल यांची जबाबदारी ईईएसएलकडे असून प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर जागेची उपलब्धता, उत्पादित विजेची उचल, मीटरिंग, पाणी, सुरक्षा व्यवस्था आदी जबाबदारी महावितरणकडे आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “सौर ऊर्जेचा सर्वाधिक फायदा शेतकरी बांधवांना मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उपकेंद्रांच्या रिकाम्या जागी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या या प्रकल्पामुळे राज्याचे चित्र बदलत आहे. ऊर्जेच्या बाबतीत शेतकरी स्वयंपूर्ण होतील आणि त्यांना दिवसाच्या वेळीही उच्च गुणवत्तेची आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध होऊ शकेल. महावितरण आणि ईईएसएलच्या या अभिनव उपक्रमामुळे पारेषण यंत्रणेवर होणाऱ्या खर्चात बचत होईल, पारेषण आणि वितरणातील गळती कमी होईल, सन २०२२ पर्यंत १०० गिगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचे देशाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास हातभार लागेल आणि जागतिक स्तरावरील पर्यावरणपूरक शक्ती म्हणून भारताचे स्थान बळकट करण्यासही मदत होईल.”
अहमदनगर जिल्ह्यात ईईएसएलने यापूर्वीच आश्वी येथील उपकेंद्रात ५०७ किलोवॉट, कोळपेवाडी उपकेंद्रात ८५८ किलोवॉट आणि देवदैठण येथे ७९९८ किलोवॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांची उभारणी केली आहे. ईईएसएलने कृषी फीडरचे परिवर्तन सौर फीडरमध्ये केले असून त्याद्वारे सुमारे ३०,००० शेतकरी ग्राहकांना लाभ होत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी सुमारे १३,४०० टन इतक्या कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात घट करणे शक्य झाले आहे. वांबोरी (तालुका- राहुरी) येथील २ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पामुळे अजून ३,००० शेतकरी ग्राहकांना लाभ होणार आहे.
या उपक्रमाच्या क्षमतेबाबत ईईएसएलच्या प्रमुख महुआ आचार्य म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेअंतर्गत ६७९ मेगावॉट क्षमतेच्या लघु सौर ऊर्जा प्रकल्पांमधून दरवर्षी सुमारे १०४ कोटी युनिट इतकी वीजनिर्मिती होऊन ९ लाख ७३ हजार टन इतके कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन घटेल असा अंदाज आहे. या वीजनिर्मितीतून वर्षभरात लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. गेला अनेक काळ सौर ऊर्जा ही भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचा आधारस्तंभ राहिली असून कृषीक्षेत्रासाठी पर्यावरणपूरक ऊर्जेचा पर्याय देण्याची क्षमता तिच्यात आहे. केवळ पर्यावरणपूरक ऊर्जेसाठीच नव्हे, तर वितरण कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठीही ती महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात महावितरणच्या सहकार्याने शून्य सबसिडी आधारित सौर ऊर्जा क्रांती सुरू करण्याची संधी मिळणे हा आमचा बहुमान आहे.”
“कृषी फीडर्सचे सौर पंपांमध्ये परिवर्तन मोठ्या प्रमाणावर करणेही शक्य असून विकेंद्रीत स्वरुपातील या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी देशभरात उपकेंद्रांच्या मोकळ्या अथवा विनावापर असलेल्या जमिनींवर कमी वेळेत करता येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचा अभिनव उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवल्यास कृषीक्षेत्राची विजेची गरज सहज भागवता येईल,” असे उदगार राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांनी काढले.
ईईएसएलने सर्व निर्धारित उपकेंद्रांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले असून बहुसंख्य उपकेंद्रांच्या जागी लघु सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू देखील केले आहे. ईईएसएलने आतापर्यंत ११७ छोट्या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण केली असून त्यातून या क्षणाला १२० मेगावॉट वीजनिर्मिती होते आहे.
याप्रसंगी महावितरण नाशिक झोनच्या मुख्य अभियंत्या रंजना पगारे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता सांगळे, ईईएसएलचे वरिष्ठ सल्लागार सतीश कर्पे, सहाय्यक व्यवस्थापक रोशन एक्का आदी उपस्थित होते.