मुक्तपीठ टीम
३७८ दिवसांच्या लढ्यानंतर आता शेतकरी आपल्या घरी जायला निघाले आहेत. १० डिसेंबर रोजी आंदोलनस्थळी साफसफाई केल्यानंतर ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शेतकरी आपापल्या घराकडे रवाना होतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली होती. शुक्रवारी शेतकऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.
एक वर्षाहून अधिक काळ लोटला असून, आता त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. ही जागा स्वच्छ करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी बहादूरगड आणि आसपासच्या गावातील लोकांचेही सहकार्याबद्दल आभार मानले. शहरातील दिल्ली-रोहतक रोडवर पोलीस स्टेशनसमोर वर्षभरापासून ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी साफसफाई केली.
याशिवाय टिकरी बॉर्डर, बहादूरगड बायपास, नया गाव चौक (पकोडा चौक) जवळही शेतकऱ्यांनी स्वच्छता केली. शेतकरी बलविंदर, सुखजिंदर, सुखदेव, वरियाम सिंग, हरदीप सिंग, सुखचैन, बलबीर सिंग यांनी सांगितले की, जेव्हा ते बहादुरगडच्या टिकरी सीमेवर आपल्या मागण्या घेऊन पोहोचले तेव्हा येथील लोकांनी त्यांना पूर्ण सहकार्य केले.
आता ते जिंकले असून येथून ते आपल्या घरी परतणार आहेत. अशा परिस्थितीत येथे स्वच्छता ठेवणे हे त्यांचेही कर्तव्य आहे. जेणेकरून येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारची घाण आणि रोगराईचा सामना करावा लागणार नाही. त्यांनी बहादूरगडमधील जनतेचे सहकार्याबद्दल आभार मानले.