उदयराज वडामकर/ कोल्हापूर
रॉबिन डेव्हिडसन / सांगली
तुम्हाला महाराष्ट्रातील राजकीय गदारोळ, राजकीय नेत्यांच्या कोटी कोटीच्या मालमत्ता, रशिया – युक्रेन या देशांमधील युद्ध या साऱ्या गदारोळात महाराष्ट्रात आपल्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणारं काय घडतंय काय बिघडतंय हे जर कळत नसेल तर ही बातमी नक्की वाचा. कोल्हापुरात शेतकरी नेते राजू शेट्टींनी सुरु केलेले शेतकऱ्यांचं दिवसा वीजेच्या हक्कासाठीचं आंदोलन आता भडकलं आहे. शेतकऱ्यांनी कसबे डिग्रजमधील महावितरणचं कार्यालय पेटवलं आहे. तर एका संतप्त शेतकऱ्यानं रात्री शेतीला पाणी द्यायला गेलेला असताना पायात आलेला साप पकडून शिरोळच्या तहसिल कार्यालया सोडल्याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकंदरीतच त्यातून सरकारी अनास्थेविरोधातील असंतोषाचा भडका उडत असल्याचं दिसत आहे.
राजू शेट्टींकडून संताप व्यक्त
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याने जंगली श्वापदांच्या हल्ल्यात त्यांचे बळी जातात. रात्रीची झोप गमवावी लागते. जीवाचा धोक्यात ढकलण्याचं हे पाप आता थांबवा, आता तरी शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काची वीज दिवस द्या, या मागणीसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी कोल्हापुरात धरणे आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा सोमवारी पाचवा दिवस आहे.
त्यांनी ट्विटरवर “रात्री वीजेच्या गुलामगिरीने बळीराजा बेजार!
बिबट्या,गव्या,सापांसारखा शेतकरीही निशाचर!
या नंतर पुन्हा पुढचा प्रश्न. “गव्याच्या शिंगाला आमचच का रक्त ?
दिवसा १० तास वीज हाच उपाय फक्त”
या शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे.
आंदोलन आता भडकू लागले…
गेल्या सात दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदीसह अन्य मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र शासन दरबारी या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढत आहे याचं प्रश्नावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहा ते बारा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा देण्यात आला होता, मात्र तरीही कोणतीच कारवाई झालेली नाही त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे, त्यामुळेच रविवारी रात्री उशिरा सांगली इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले.
कसबे डिग्रज येथील एम एस ए बीचे कार्यालय पेटवले: कागदपत्रे आणि अन्य साहित्य जाळून खाक
आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटवले. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. यात या घटनेत महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र
सरकारने तात्काळ दखल न घेतल्यास असे प्रकार आणखीन तीव्र करण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे.
आगीत लाखोंचं नुकसान
- महावितरणच्या कार्यालयाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
- दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत महावितरणच्या कार्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
- कार्यालयातील कागदपत्रे व अन्य साहित्य जाळून खाक झाले आहेत.
- उर्जा मंत्र्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची धग वाढणार हे निश्चित असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी सांगितले.
शिरोळच्या तहसिल कार्यालयात शेतातील साप सोडला!
रात्रपाळीला पिकांना पाणी पाजवत असताना पायात आलेला साप अज्ञात शेतकऱ्याने शिरोळच्या तहसिल कार्यालयात सोडला आहे. हा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.