गेले अनेक दिवस दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या नव्या कृषी कायद्यांसंबंधित याचिकेवर आज सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने शेतकरी आंदोलनावर चिंता व्यक्त केली आहे. आम्ही परिस्थिती जाणून आहोत. चर्चेच्या माध्यमातून हा तिढा सोडवावा अशी अपेक्षा आहे, असं सरन्यायाधीश बोबडे म्हणाले. यासह तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याविरोधात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
एम. एल. शर्मा यांनी ही याचिका केली असून “कोर्टात शेतकरी आंदोलनावरून काय सुनावणी सुरू आहे हे तुम्हाला माहिती आहे का?” असा प्रश्न सरन्यायाधीश बोबडे यांनी शर्मा यांना केला. सुधारित याचिका दाखल केली आहे, असं उत्तर एम. एल. शर्मा यांनी त्यावर दिलं.
यानंतर सरन्यायाधीश बोबडे यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना शेतकरी आंदोलनावर सुनावणी कधी आहे? असा प्रश्न केला. अद्याप तारीख निश्चित झाली नसल्याचं तुषार मेहता म्हणाले. पण इतर प्रकरणांसोबत याची सुनावणी घेऊ नये, असंही ते म्हणाले. पण शेतकरी आंदोलनावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही, यामुळे या प्रकरणाची सुनावणीही इतर प्रकरणांसोबत व्हायला हवी, असं सरन्यायाधीश बोबडे म्हणाले.
तसेच आता सर्व याचिकांवर येत्या सोमवारी ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे. सर्व प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी घेऊ. चर्चेतून तोडगा निघावा अशी न्यायालयाचीही इच्छा आहे, असे सरन्यायाधीश शरद बोबडे पुढे म्हणाले.
शेतकरी आंदोलनाच्या स्थितीत कुठलीही सुधारणा झालेली नाही, असं सरन्यायाधीश म्हणाले. तर यावर लवकरच तोडगा निघेल, अशी दाट शक्यता असल्याचं अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितलं.