मुक्तपीठ टीम
विधान परिषद सभागृहातून येत्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवृत्त होणाऱ्या सर्वश्री विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), डॉ.सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ.रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) या पाच विधान परिषद सदस्यांना आज सभागृहात निरोप देण्यात आला.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त करून सभागृहाचे आभार मानले.