मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करण्याचा तयारीत आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे, असा टोला लगावला आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी सत्ताधारी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. प्रचारसभेतून जनतेशी संवाद साधताना कोरोनाचे देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे, कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच राज्यात लोकशाही नसून लॉकशाही आहे, असं फडणवीस म्हणाले.
प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे. दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे, असं फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना फडणवीस यांनी वाढीव वीज बिलावरुन सरकारवर निशाणा साधला. हे ठाकरे सरकार केवळ लबाड सरकारच नाही तर महावसुली सरकार आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.