मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत राहिलं ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांच्या फैरींनी. सत्ताधारी मविआ आघाडीला उघडं पाडणारी त्यांचे स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडीओ क्लिप्स असलेले पेनड्राइव्ह भीती निर्माण करणारेच ठरले. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर आक्रमक हल्ला चढवला. मात्र त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं जोरदार प्रत्युत्तर चर्चेचा विषय ठरलं आहे. मराठीत्व, हिंदुत्व ते निवडणुकीतील मोदीत्व अशा प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी ठाकरेंवर हल्ला केला. तसंच “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही व तुम्ही म्हणजे मराठी नाही,” अशा शब्दात शिवसेनेच्या मूळ तत्वालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतरची त्यांची जहाल भूमिका ही शिवसेना भाजपा नातं कायमचं संपवण्याचं निर्देशक असल्याचं मानलं जात आहे.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही व तुम्ही म्हणजे मराठी नाही…
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कोणत्याही आरोपावर ठोस उत्तर दिलेले नाही.
- स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोरोना काळात २४ महिन्यांत अनेक मालमत्ता खरेदी केल्या यावर ते काहीही बोलले नाहीत.
- तुमच्या घर-गाड्यांवर कारवाई होत आहे म्हणून ईडीचा त्रास होतो.
- मुळात तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही व तुम्ही म्हणजे मराठी नाही.
मलिकांचे समर्थन ठाकरेंना करावे लागते याचे वाईट वाटते!
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील चर्चेला मुद्देसूद उत्तर द्यायला हवे होते.
- पण त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण विधानसभेत केले.
- प्राणवायू खरेदीतील भ्रष्टाचार, यशवंत जाधव यांनी गोळा केलेली बेहिशेबी संपत्ती, २१ कोटी रुपयांची टॅब खरेदी अशा विविध विषयांवर त्यांनी उत्तर दिलेले नाही.
- दहिसरमधील भूखंडाचे मूल्य यंत्रणेने ठरवले असले तरी त्यावर पूर्णपणे झोपडपट्टी आहे हे कसे विसरायचे, असा सवाल फडणवीस यांनी केला.
- युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मदत मागावी कारण त्यांच्याजवळ टोमणेबॉम्ब आहे.
- ठाकरे यांचे भाषण म्हणजे अरण्यरुदन होते असा चिमटा फडणवीस यांनी काढला.
- त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या हसिना पारकर यांच्यासोबतच्या जमीन खरेदीचे काय?
- मलिकांचे समर्थन ठाकरे यांना करावे लागते याचे वाईट वाटते.
तुमच्या घरगडींना ईडी बोलवतेय म्हणून ईडीला घरगडी म्हणता का?
- आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभं राहू.
- तुमच्या घरगडींना ईडी बोलवतेय म्हणून ईडीला घरगडी म्हणता का?
- पोलिसांकडून आमच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करतायेत.
- मग आम्ही पोलिसांना घरगडी म्हणायचं का?
- हे कुणीच घोषित करू नये उद्या कोण आणि परवा कोण?
- मग ही अक्कल संजय राऊतांनाही देणार का?
- त्यांनी घोषित केलं ना की, बाप बेटा जेलमध्ये जाणार, आमका जाणार तमका जाणार.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आक्रमकतेने शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना घायाळ करण्याचा प्रयत्न केला असला तरी राजकारणात हे चालत असतंच. या सर्वा घटनाक्रमानंतरही दोन्ही नेते हसतमुखाने एकमेकांना भेटले आणि बोलले, याकडे बोट दाखवत राजकारणात कधीच कायमच संपत नसतं, असंही मत जाणकार व्यक्त करतात.