मुक्तपीठ टीम
राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत ३० जून पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी १८ जून २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांच्याकडे मुदत वाढ देण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० जूनच्या आत आपले अर्ज दाखल करून घ्यावेत असे आवाहन समाज कल्याण आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.