मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या चौकशीची सीबीआयने तयारी केली आहे. सीबीआयचे पथक माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करताना काही प्रश्न नक्कीच विचारेल. ज्यातून तपासाला एक वेगळी दिशा मिळू शकेल.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले. काही तासांनंतर देशमुख यांनी राजीनामा दिला. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. ते सीबीआयच्या तपासाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारही उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
या प्रकरणाची चौकशी अभिषेक दुलार यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयचे पथक करत आहे.
ते हिमाचल प्रदेश कॅडरचे २००६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पथक सर्वप्रथम परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवणार असल्याची शक्यता आहे. आयआयटी दिल्ली येथून इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी केलेल्या दुलार यांनी राज्य दक्षता आणि अँटी करप्शन ब्यूरोची जबाबदारी सांभाळली आहे. ते शिमला, मंडी आणि कुल्लूचे पोलिस अधीक्षक राहिले आहेत. विजलेंस डिपार्टमेंटमधील त्यांचे काम पाहून त्यांना या प्रकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
परमबीर सिंहांसाठी अपेक्षित प्रश्न
- १०० कोटींच्या महावसुलीविषयी तुम्हाला कधी आणि कशी माहिती मिळाली?
- सचिन वाझे यांनी जेव्हा ही माहिती तुम्हाला सांगितली, तेव्हा तुम्ही काय केले?
- तुम्ही वसूली थांबवण्याचा प्रयत्न केला की नाही?
- महावसुली हा गुन्हा, तुमच्या अधिकाऱ्याने माहिती दिली. आरोपी माहितीतील. तुम्ही पदाचा वापर करून एफआयआर किंवा किमान तक्रार का नोंदवली नाही?
- सचिन वाझे यांना १६ वर्ष निलंबित केल्यावर कोणत्या आधारावर पुन्हा घेण्यात आले?
- वाझेंना सेवेत परत घेण्यात तुमची काय भूमिका होती?
- वाझेंंना परत घेण्यासाठी तुमच्यावर कोणाचाही, राजकीय नेता, अधिकारी यांचा दबाव होता का?
- गुन्हे शाखेत अनेक ज्येष्ठ असूनही वाझेला सीआययू प्रमुख का बनवण्यात आले?
- पोलीस प्रोटोकॉल नियम बाजूला ठेवून वाझे थेट आपल्याला रिपोर्ट का करत होते?
- वाझे सेवेत परतताच आपण जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण प्रकरणे त्याच्याकडे का देत होता?
- सहाय्यक पोलिस निरीक्षक सारख्या कनिष्ठ पदावर असूनही तुम्हाला कधी वाझेच्या क्षमतेवर शंका नव्हती का?
- वाझेंचा जुना ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्यांचे व्यावसायिक कौशल्य योग्य का वाटले?
- अँटिलियासमोरील स्फोटके प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सचिन वाझेला चौकशी का सोपवली गेली?
- सचिन वाझेंचं अंबानी स्फोटके प्रकरणातील वागणं तुम्हाला का संशयास्पद वाटत नव्हतं?
- सचिन वाझेला त्याच्या पदापेक्षा खूप जास्त अधिकार देण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याचा दबाव होता का?