रोहिणी ठोंबरे
आपल्या देशातील पारंपरिक कौशल्याचं प्रदर्शन म्हणजे “हुनर हाट”. देशातील सर्व राज्यांमधील जवळपास हजार विणकर, शिल्पकार, कारागीर मुंबईत आले. त्यांच्या हस्तनिर्मित स्वदेशी उत्पादनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
देशाच्या प्रत्येक भागात ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव देणारा, कौशल्य कुबेरांचा ४० वा ‘हुनर हाट’ २७ एप्रिलपर्यंत मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील हजाराहून अधिक कारागिरांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहचवातानाच मुंबईकर ग्राहकांनाही देशभरातील पारंपरिक दर्जेदार कलाकृतींच्या उत्पादनांच्या खरेदीची संधी आहे. या हाटमध्ये केवळ खरेदीच नाही तर खा-प्या-मजाही करायला मिळत आहे. सोबतीला मनोरंजनही आहेच!
कारागीर, विणकर, शिल्पकारांच्या कलांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या, चाळीसाव्या विक्रमी “हुनर हाट” चे अभूतपूर्व आणि भव्य आयोजन मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात, ३१ पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास १००० विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत.
Vocal For Local!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या कानाकोपऱ्यातील असलेल्या जनतेच्या कलेला हुनर हाटद्वारे न्याय मिळवून दिलेला आहे. ‘हुनर हाट’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘स्वदेशीतून स्वावलंबन’ या संकल्पनांचा सशक्त, यशस्वी, सुदृढ, आणि प्रभावी प्रकल्प म्हणून सिद्ध होतो आहे.
‘हुनर हाट’ ने एकीकडे देशाच्या शतकानुशतकांची परंपरा असलेल्या शिल्पकला, विणकला या पारंपरिक कलांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रोत्साहन यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, तर दुसरीकडे ९ लाखांपेक्षा जास्त विणकर आणि शिल्पकारांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात अधिक महिला कारागिरांचा समावेश आहे. आजपर्यंत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ३९ हुनर हाट मध्ये प्रत्येक हुनर हाटला सरासरी ८ ते १० लाख लोकांनी भेट दिली आहे. अशाप्रकारे आज पर्यंत ‘हुनर हाट’ मध्ये ४ कोटी पेक्षा जास्त लोक खरेदी करायला आणि कौशल्य कुबेरांचा उत्साह वाढवायला आले आहेत. येथे वेगवेगळे गीत-संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, कलांचे प्रदर्शन त्याचबरोबर पदार्थांची मेजवानीही चाखायला मिळते.
पाहा व्हिडीओ :