अपेक्षा सकपाळ
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू केलेले सर्व निर्बंध जणू फक्त सर्वसामान्यांसाठीच असल्याचे मानत अनेक राजकीय नेते वाट्टेल तसं वागत आहेत. एकीकडे राजकीय नेत्यांचे असे बेजबाबदार वागणे सर्रास समोर येत असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मात्र स्वत:च्या मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ रद्द करून एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या लाइव्ह संवादात त्यांचा उल्लेख करत कौतुक केल्यानंतर सर्वत्र राऊतांची प्रशंसा केली जात आहे.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली. तरीही काही राजकीय नेत्यांचे खासगी सोहळे वादाच्या भोवऱ्यात सापडले.
१- महाडिकांच्या घरातील विवाह सोहळा
त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक यांच्या विवाह समारंभात कोरोना नियमांचा भंग झाल्याने गुन्हा नोंदवल्याच्या बातम्या आल्या. त्या विवाह सोहळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांपैकी अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती, त्यामुळे त्याचा राजकीय मुद्दा झाला नाही.
२- राठोडांचा पोहरादेवी दर्शन सोहळा
त्याचवेळी ठाकरे मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीला दर्शनासाठी भेट देतेवेळी जमवलेली गर्दी वादाच्या भोवऱ्यात सापडली. पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकऱणामुळे अडचणीत आलेल्या संजय राठोडांच्या मार्गात आणखी अडथळे वाढले. पिंपरीतील महापौर यांनी आमदार यांच्या वाढदिवसासाठी आयोजित केलेला जंगी सोहळाही कोरोना निर्बंधांना फाट्यावर मारणारा ठरला.
३- जगतापांचा वाढदिवस सोहळा
पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत असलेल्या पुणे जिल्ह्यातील पिंपरीचचिंचवड मनपाच्या हद्दीतही कोरोना रुग्ण संख्या वाढतीच आहे. तेथे सामान्यांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही जगताप वाढदिवसासाठी आयोजित मिस आणि मिसेस पिंपरी चिंचवड स्पर्धेचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याआधीच्या दोन कार्यक्रमांप्रमाणेच जगतापांच्या या कार्यक्रमातही अनेक उपस्थित मास्कविना होते. सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजलेले होते. त्यात आणखी आक्षेर्पाह भाग असा की स्थानिक महापौर माई ढोरे यांनी मास्क न घालता स्वत:च रॅम्प वॉक केला. एकीकडे मनपा सामान्यांवर कडक निर्बंध लादत असताना महापौरांचा मास्कविना रॅम्पवॉक लोकाना खुपणे स्वाभाविकच होते.
राजकीय नेत्यांच्या या बेजबाबदारपणाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी उचललेलं पाऊल हे वेगळं उठून दिसत आहे. त्यांनी एक राजकीय नेता म्हणून जबाबदारणाचा वेगळा आदर्श घालून दिल्याचे मानले जात आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ रद्द केला आहे.
अशाच जबाबदारीच्या भावनेतून मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीही आपला वाढदिवस साजरा केला नाही. त्यांनी त्यादिवशी कोरोना योद्ध्यांचा गौरव केला.
यामुळेच “कुठे जबाबदार नितीन राऊत आणि कुठे बेजबाबदार ‘ते’!” अशी चर्चा रंगू लागली आहे.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मी माझ्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याला संबोधित करताना आमच्या सामाजिक भावनेचे कौतुक केले. तसेच माझ्या मुलाला आशीर्वाद दिला. मुख्यमंत्र्यांचे याबद्दल मी आभार मानतो, असे ट्वीट मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
Considering the #Corona situation, we have cancelled wedding reception of my son Kunal. While addressing the state today, Hon CM Uddhav Thackeray @CMOMaharashtra appreciated our social consciousness and blessed my son. I thank the CM for the same. pic.twitter.com/U5QrJ9Q5Jr
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) February 21, 2021