मुक्तपीठ टीम
भाजपाचा आज स्थापना दिन आहे. याच दिवशी शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंतांच्या बंडखोरीचा फटका शिवसेनेला चांगलाच बसला होता. आता त्या थेट भाजपात गेल्याने मनपा निवडणुकीत नेमकं कुणासाठी, काय घडेल आणि काय बिघडेल अशी चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांचे भाजपात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्यांच्या निवासस्थानी हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
कडवट शिवसैनिक बाळा सावंत
माजी आमदार बाळा सावंत हे मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाचे कडवट निष्ठावान होते. साध्या राहणीसाठी मात्र कडवट पक्षनिष्ठा आणि सतत जनतेसोबत राहून अगदी छोटी मोठी कामे करण्यातही सतत सक्रिय राहणारे म्हणून आमदार बाळा सावंत ओळखले जात असत. शिवसेनेत असूनही त्यांना मानणारा मोठा वर्ग सर्व जाती-धर्मांमध्ये आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा पराभव करून तृप्ती सावंत जायंट किलर ठरल्या. पण ठाकरेंवर सतत कडवट टीका करणाऱ्या राणेंसारख्या मोठ्या नेत्याला आमदार होण्यापासून रोखण्याची कामगिरीही तृप्ती सावंतांना पुढच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी पात्र ठरवू शकली नाही.
जायंट किलरचे तिकीट कापणे महागात पडले
अंतर्गत राजकारणात त्यांची उमेदवारी गेली आणि तत्कालीन महापौर महाडेश्वरांना उमेदवारी दिली गेली. नारायण राणेंसारखा मातब्बर उमेदवार समोर असूनही शिवसेनेने तृप्ती सावंत उमेदवार असताना १९ हजार मताधिक्याने जिंकलेल्या जागी महाडेश्वर काँग्रेसच्या मतदारसंघाबाहेरील उपऱ्या नवख्या उमेदवारासमोर सहा हजारांनी पराभूत झाले. काँग्रेसचे झिशान बाबा सिद्दीकी विजयी झाले. भाजपाने आशिष शेलारांचा वांद्रे पश्चिम मतदारसंघ मोकळा करण्यासाठी तेथील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मुलाला वांद्रे पूर्वमध्ये अप्रत्यक्ष साथ देण्यासाठी तृप्ती सावंतांमागे बळ उभे केले होते, असा आरोप शिवसेनेकडून ऑफ द रेकॉर्ड केला गेला. मात्र, शेवटी शिवसेनेने महत्वाच्या निवडणुकीत मातोश्री असलेला मतदार संघ गमावला तो गमावलाच. हा फटका शिवसेनेने उमेदवार बदलल्याचाच होता.
मनपा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता?
आता तृप्ती बाळा सावंत थेट भाजपात गेल्याने शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीत त्यांचे पती दिवंगत माजी आमदार बाळा सावंत यांना मानणारा वांद्रे पूर्व परिसरातील मोठा वर्ग भाजपाकडे वळू शकतो. त्यातच याच परिसरात कार्यरत असणारे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अॅड अनिल परब यांनाही भाजपा आता ठरवून लक्ष्य करू लागल्याने शिवसेनेसाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
२०१९ विधानसभा निवडणुकीतील मतदान – वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
- काँग्रेस – झिशान बाबा सिद्दिकी ३८,३०९
- शिवसेना – विश्वनाथ महाडेश्वर ३२,४७६
- अपक्ष – तृप्ती बाळा सावंत २४,०३४
(एमआयएम, मनसे यांनी १० हजारापेक्षा जास्त मते घेतली होती.)