मुक्तपीठ टीम
देशात एकीकडे बेरोजगारी, उपासमारी, कुपोषणासारखे प्रश्न उपस्थिती होत आहेत, काहींची परिस्थिती एवढी गंभीर असते की, त्यांना दोन वेळेचं जेवण ही मिळत नाही. पण दुसरीकडे देशात मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने यासंबंधित अहवाल सादर केला आहे. ‘फूड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट २०२१’ च्या नुसार, एक भारतीय प्रत्येक वर्षी तब्बल ५० किलो अन्नाची नासाडी करत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. त्याच वेळी जगभरात एकूण ६९ कोटी लोक उपासमारीचे शिकार होत असल्याचे समोर आले आहे.
अहवालानुसार, जगभरात दरवर्षी १७ टक्के अन्न वाया जाते. जे जवळपास १.०३ अब्ज टन आहे. मागील अहवालातून समोर आलेल्या अन्नाच्या नासाडीपेक्षा यावेळीची नासाडी अधिक आहे. असे आढळून आले आहे की, नासाडीतील ६१ टक्के नासाडी ही घरातील अन्नाची होत आहे. तर, अन्न सेवा देणाऱ्यांकडून २६ टक्के आणि इतर भागात १३ टक्के अन्नाची नासाडी होत आहे. तसेच २०१९ मध्ये तब्बल ९३० कोटी टन अन्नाची नासाडी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, यूएनच्या अहवालात असे म्हटले आहे की, खराब किंवा नाश झालेले अन्न हे शेतात पिकवले जाते आणि पुरवठा करणाऱ्यांच्या माध्यमातून ते ग्राहकांपर्यंत पोहोचते. मात्र, याची नासाडी केली जाते आणि ते कचराच्या डब्यात टाकले जाते. या अन्नाने कोट्यवधी लोक आपले पोट भरु शकतात. अन्नाच्या नासाडीने आर्थिक स्थितीप्रमाणेच पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे.
तसेच अन्नाची नासाडी थांबवून आपण हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करू शकतो, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.