मुक्तपीठ टीम
महात्मा गांधी. आपल्या देशाच्याच नाही तर जगाच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व. त्यांचे विचार आणि कर्तृत्व कोणत्याही मर्यादेत सामावू शकत नाहीत. गांधींजी देशासाठी, मानवतेसाठी केलेल्या कार्यामुळे जसे ओळखले जातात, तसेच निसर्गप्रेमासाठीही. त्यामुळेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनी त्यांना मानवंदना देण्यासाठी एका रांगाळीकारानं हिरवाईनं घडवलेली ग्रीन गांधी कलाकृती सर्वात समर्पक ठरत आहेत.
गांधींजींची वेगळी कलाकृती
- मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये हिरवाईनं कलात्मक इतिहास घडवला आहे.
- आजवर राष्ट्रपिता महात्मा गांधींची चित्रं, शिल्पं अशा माध्यमातून घडवली नसेल अशी हरित कलाकृती तिथं घडवली गेली आहे.
- जी पाहणाऱ्याला मोहित करते आणि भव्यतेने मनात ठसते.
हिरवाईनं घडली ग्रीन गांधी कलाकृती!
- स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त, छिंदवाडातील केकेएफ म्हणजेच किर्तीश केअर फाउंडेशनने काही तरी वेगळं करायचं ठरवलं.
- त्यातून ग्रीन गांधी कलाकृतीची कल्पना पुढे आली.
- यासाठी विद्याभूमी शाळेच्या ११ हजार चौरस फूटांचे विशाल अंगण निवडण्यात आलं.
- प्रसिद्ध रांगोळी कलाकार रजत गधेवाल यांनी ग्रीन गांधी तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली.
- त्यांच्या नेतृत्वाखाली बारा कलाकारांच्या टीमने ९ ऑगस्टपासून काम सुरू केले.
- अखेर पाच दिवस १५ हजार रोपांच्या मदतीने ग्रीन गांधींची कलाकृती साकारली.
ग्रीन गांधी कलाकृती आता लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. १६ ऑगस्टपर्यंत लोक ही कलाकृती पाहू शकतात. ही प्रचंड कलाकृती बनवण्याचा उद्देश केवळ स्वातंत्र्याच्या महान नायकाचे ७५ व्या स्वातंत्र्यदिनी स्मरण करणे हा नाही, तर पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे देणे हाही आहे.
ही कलाकृती बनवण्यासाठी वापरल्या गेलेल्या १५ हजारांहून अधिक वनस्पती केकेएफ संस्थेच्या देखरेखीखाली १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान छिंदवाडा शहर आणि आसपासच्या परिसरात लावल्या जातील. त्यांची त्यांची संपूर्ण सुरक्षित देखभाल केली जाईल. हिरव्या वनस्पतींनी साकारलेली ही भव्य हरित कलाकृती जागतिक विक्रमांच्या यादीत नोंदवण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे.