मुक्तपीठ टीम
खारफुटीच्या कांदळवनाला कचरामुक्त करण्यासाठी नवी मुंबईतील एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशन सतत प्रयत्न करते. लोकसहभागातून कांदळवनांची स्वच्छता करण्याच्या त्यांच्या मोहिमेने शंभर आठवडे ओलांडले.
We are celebrating our centenary week of MANAGROVES CLEANUP DRIVE on July 17, 2022 between 8am-12noon (Mega Drive).
Please extend your hands towards protection of Coastal Biodiversity & Wildlife Conservation.@MangroveForest @NMMCCommr @SunilLimaye2 @vrtiwari1 @AdarshReddyIFS pic.twitter.com/C36ZL5Rggx— Environment Life Foundation (@EnvironmentLife) July 13, 2022
खारफुटी. समुद्र किनाऱ्यांवर असणारी एक अशी वनस्पती, जिच्यामुळे होतो बचाव किनाऱ्यांचा. होते संवर्धन समुद्रातील जीवसृष्टीचे. मात्र, किनाऱ्यांचं, समुद्री जीवसृष्टीचं आणि आपल्या जीवनाचाही बचाव करणाऱ्या या खारफुटीला आपल्यातील काही बेजबाबदारपणे धोक्यात आणतात. खारफुटीला कचऱ्याचा विळखा पडतो. या खारफुटीच्या कांदळवनांना कचरामुक्त करण्याचा ध्यास नवी मुंबईतील धर्मेश बराई यांनी घेतला आहे. त्यांचं एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशन सतत प्रयत्न करते. त्यासाठी त्यांनी स्वीकारलेला मार्ग हा सरकारवर सर्व जबाबदारी टाकण्याचा नाही. तर कांदळवनांची स्वच्छता ही आपली जबाबदारी मानून ते काम करतात. त्यासाठी सरकारी यंत्रणा, महानगरपालिका यांच्या यंत्रणांच्या जोडीनेच लोकांनाही ते सहभागी करून घेतात.
लोकसहभागातून कांदळवनाची स्वच्छता करण्याची खास मोहीम त्यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी सुरु केली. त्यांच्या मोहिमेला शंभर आठवडे झाले. १७ जुलै २०२२ रोजी एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशन शंभर आठवड्यांचा अथक, सतत निसर्ग रक्षणाचा प्रवास साजरा करण्यासाठी एका महामोहिमेचे आयोजन केले.
कांदळवन १०० टन कचरामुक्त!
- एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशनच्या पर्यावरणप्रेमींनी २०२०पासून शंभर रविवार कांदळवन स्वच्छता मोहीम राबवली.
- या कालावधीत किमान १०० टनांहून अधिक कचरा काढण्यात आला.
- या महामोहिमे ३००हून अधिक स्वयंसेवकांकडून सफाई करण्यात आली.
- नेरुळ ते बेलापूर या भागांतील कांदळवनांमधून १५ ऑगस्ट २०२० पासून स्वच्छता मोहीम सुरु आहे.
कचऱ्यात काय काय?
- कांदळवनांतून सुमारे १०० टन कचरा काढण्यात आला आहे.
- यात वैद्यकीय कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण ९० टक्के आहे.
- त्या कचऱ्यात रबरी चपला, बल्ब, ट्यूबलाइट, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या यांची संख्याही मोठी आहे.
- शंभराव्या रविवारी स्वच्छता मोहिमेत ३०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशनच्या धर्मेश बराई यांनी श्रीराम शंकर आणि रोहन भोसले या दोघांच्या साथीने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. पाहता पाहता अनेकांची साथ लाभली. या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी, स्थानिक बांधवांचाही सहभाग आहे. आतापर्यंत हजारांहून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका आणि खासगी संस्थांचंही खास सहकार्य लाभलं. शंभराव्या आठवड्याच्या महामोहिमेला मोठा पाऊस असूनही पर्यावरणप्रेमी तर हजर होतेच पण मनपा अधिकारी, आयएफएस वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि खारफुटी विभागाचे प्रमुख विरेंद्र तिवारी, उपप्रमुख आदर्श रेड्डी, महाराष्ट्र वन विभागाच्या सहसंचालक निनू सोमराज, अधिकारी अनिता पाटील हे मान्यवर खास उपस्थित होते.