मुक्तपीठ टीम
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२१ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या २० डिसेंबर २०२१ पूर्वी पाठवावीत, असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार ( राज्यस्तरीय ), राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – वृत्तपत्र प्रतिनिधी (एक), इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी (एक) आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ( मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्याकरिता ( एक ) अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या नामांकनाच्या प्रवेशिका यापूर्वी मिळालेल्या पुरस्काराच्या व उल्लेखनीय कामाच्या तपशीलवार माहितीसह ( वृत्तवाहिनींच्या पत्रकारांनी वृत्तांकन केलेली सी. डी. किंवा पेनड्राईव सोबत पाठविणे आवश्यक) पाठवण्यात याव्यात. जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्ज अपेक्षीत नसून शिफारशी व सूचना स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका येत्या २० डिसेंबर २०२१ पूर्वी अध्यक्ष, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, तळमजला, पत्रकार कक्ष, मंत्रालय, मुंबई ४०००३२ किंवा ई मेल, mahamantralaya@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे.
कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार- पत्रकाराने किमान २५ वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता केलेली असावी. वय ६० वर्षे पूर्ण असावे. (राज्यस्तरीय) पत्रकारिता क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड केली जाईल. तसेच राज्यातील पत्रकार, पत्रकार संघटना व मान्यवर व्यक्ती यांच्या शिफारशीही विचारात घेण्यात येतील. यापूर्वी जेष्ठ पत्रकार वसंत देशपांडे, विनायक बेटावदकर, विजय वैद्य, दिनू रणदिवे दिनकर रायकर आणि प्रकाश बाळ जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (दोन पुरस्कार) हा पुरस्कार वृत्तपत्रीय प्रतिनिधी व इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी यांना देण्यात येणार आहे. पत्रकारितेत पूर्णवेळ सेवा बंधनकारक आहे. भाषेचे बंधन नाही. मागील दोन वर्षाच्या बातम्यांची कात्रणे किंवा चित्रफित/ ध्वनीफीत पाठवाव्यात. कात्रणे किंवा ध्वनीफीत यावर अर्जदाराचे नाव तसेच संपादक किंवा संस्थेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडून प्रवेशिका सांक्षाकित केलेली असावी. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-(एक पुरस्कार) या पुरस्कारासाठी केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना भाग घेता येईल. एक वर्षांची (१ जानेवारी २०२१ ते अर्ज करण्याचा दिनांक पर्यंत) कात्रणे / ध्वनीफीत/ चित्रफितीसह प्रवेशिका द्याव्यात. चारही पुरस्कार निवडताना पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.