मुक्तपीठ टीम
गेल्या एका वर्षाच्या कालावधीत १ लाख ९९ हजार ४८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात कौशल्य विकास विभागाने महत्वाची भूमिका बजावली आहे अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
कोरोना संकटकाळात निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याद्वारे राज्यात फक्त डिसेंबर महिन्यात ३४ हजार ७६३ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या काळात डिसेंबरअखेरपर्यंत १ लाख ६७ हजार ७१ बेरोजगारांना रोजगार मिळाला.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
माहे डिसेंबरमध्ये विभागाकडे ८९ हजार ३२८ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात १२ हजार ६८०, नाशिक विभागात २२ हजार ८४४, पुणे विभागात २० हजार ९४५, औरंगाबाद विभागात १६ हजार ५३०, अमरावती विभागात ८ हजार ६६६ तर नागपूर विभागात ७ हजार ६६३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
माहे डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ३४ हजार ७६३ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ९०२, नाशिक विभागात १४ हजार ९२०, पुणे विभागात ६ हजार ८२६, औरंगाबाद विभागात ८ हजार १४५, अमरावती विभागात ३ हजार ९२८ तर नागपूर विभागात ४२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.
राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये १२ ते २० डिसेंबर २०२० दरम्यान झालेल्या ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास मोठे यश मिळाले. यामध्ये राज्याच्या विविध भागातून ४९७ उद्योगांनी त्यांच्याकडील ८६ हजार ४३५ रिक्तपदे या मेळाव्यातून भरण्यासाठी खुली केली. या पदांसाठी १ लाख ६० हजार ८२७ बेरोजगार उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ५ हजार २८१ उमेदवारांना आतापर्यंत विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून उर्वरिक्त रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे अशी माहितीही मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
रोजगाराची ही चळवळ यापुढील काळातही सुरुच राहणार आहे. यासाठी नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.