मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात श्रीमंत माणूस आणि सर्वाधिक चर्चीत उद्योगपती एलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला कंपनी आता भारतात दाखल झाली आहे. त्यांचा तसा इरादा असल्याची चांगली बातमी मुक्तपीठनं आधीच दिली होती. आता तसं प्रत्यक्षात घडू लागलं आहे. टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून बंगलोर येथे त्याची नोंदणी झाली गेली आहे. टेस्ला भारतात लक्झरी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन आणि विक्री करणार आहे. टेस्लाचे पहिले कार्यालय बेंगळुरूमध्ये नोंदवले आहे. बेंगळूरू येथील रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट युनिटद्वारे ते सुरूवात करणार आहेत.
टेस्लाने ८ जानेवारी रोजी बेंगळुरूमध्ये नोंदणी केली. त्यांचा नोंदणी क्रमांक १४२९७५ आहे. वैभव तनेजा, व्यंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेनस्टाईन हे नव्या कंपनीचे कार्यकारी अधिकारी आहेत. तनेजा टेस्ला येथे सीएफओ आहेत, तर फेन्स्टाईन टेस्ला येथे ग्लोबल ट्रेड डायरेक्टर आहेत. कंपनी मॉडेल-३ ला भारतात लाँच करू शकते. वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी टेस्लाची डिलीवरी सुरू होऊ शकते.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका ट्विटमध्ये सांगितले होते की, “२०२१ मध्ये त्यांची कंपनी भारतात प्रवेश करेल.”
गडकरी म्हणाले, “अमेरिकेतील टेस्ला ही कंपनी पुढील वर्षापासून आपल्या कारसाठी वितरण केंद्र सुरू करणार आहे. मागणीच्या आधारे कंपनी उत्पादन कारखाना उभारण्याचाही विचार करेल. पुढील पाच वर्षांत जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादक होण्याची क्षमता भारतामध्ये आहे.
२०२० मध्ये टेस्लाची वार्षिक विक्री ३६ टक्क्यांनी वाढली. तर, पाच लाख वाहनांच्या वार्षिक वितरणाच्या लक्ष्यापेक्षा ही कंपनी मागे राहिली. कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, त्यांनी २०२० मध्ये ४९९,५०० वाहने दिली. यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान १८०,५७० क्रीडा युटिलिटी वाहने (एसयूव्ही) आणि सेडानचा समावेश आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी २०२० मध्ये पाच दशलक्ष वाहनांच्या वितरणाचे ध्येय ठेवले होते. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क गेल्या आठवड्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांनी अमेझॉनच्या जेफ बेझोसला मागे सोडले. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या १८७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीपेक्षा एलॉन मस्कची संपत्ती १८८ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. टेस्लाच्या शेअर किंमतीत सतत वाढ झाल्यामुळे हे घडले आहे.
पाहा व्हिडीओ: