मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यात करारासंदर्भात वाद सुरु आहे. एलॉन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग कंपनीला इशारा दिला आहे की जर त्यांचे शब्द पाळले नाहीत तर ते करार रद्द करतील. मस्क यांच्या वकिलांनी सोमवारी ट्विटरला लिहिलेल्या पत्रात ही धमकी दिली आहे. ट्विटरने हे पत्र सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज कमिशनकडे सादर केले.
एलॉन मस्कचा असा विश्वास आहे की ट्विटर स्पॅम आणि बनावट खात्यांबद्दल अचूक माहिती न देऊन त्याच्यासोबतच्या विलीनीकरण कराराचे उल्लंघन करत आहे. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला स्पॅम किंवा फेक अकाऊंटचे तपशील शेअर करण्यास सांगितले होते. मस्कने ट्विटरला इशारा दिला आहे की, जर गोष्टी अशाच चालू राहिल्या तर ते ही कंपनी खरेदी करण्याचा ४४ अब्ज अमेरिकी डॉलरचा करार रद्द करतील.
ट्विटरच्या पद्धती ढिसाळ!!
- ट्विटरने केवळ कंपनीच्या चाचणी पद्धतीचे तपशील पुरवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
- मात्र हे मस्क यांच्या विनंतीला नकार देण्यासारके आहे, असे वकिलांनी नमूद केले आहे.
- ट्विटरच्या पद्धती ढिसाळ असल्याचे मस्क यांचे म्हणणे असून, ते त्यांची स्वत: पडताळणी करू इच्छितात.
- ट्विटरचा अलीकडचा पत्रव्यवहार लक्षात घेता, ही कंपनी एप्रिलमध्ये झालेल्या करारांतर्गत असलेल्या माहिती मिळवण्याचा अधिकार निष्फळ ठरवत असल्याचेही वकिलांनी म्हटले आहे.