मुक्तपीठ टीम
कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची घोषणा होताच लढाईची तयारी सुरु झाली आहे. पुन्हा एकदा महादेवराव महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचंच नाही तर राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या गुरुवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २ मे रोजी मतदान होणार आहे.
गोकुळ हे मोठे आर्थिक साम्राज्य असल्याने कोल्हापुरच्या राजकारणात आमदारकीपेक्षाही काही राजकारणी गोकुळच्या संचालकपदाला पसंती देतात असं म्हणतात. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीची घोषणा होताच आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी अनेक मातब्बर हे साम्राज्य ताब्यात घेण्यासाठी आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत.
मागच्या २५ वर्षांपासून गोकुळ दूध संघावर महादेवराव महाडिक यांची निर्विवाद सत्ता आहे. यंदा या सत्तेला शह देण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मोट बांधत सतेज पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनायक कोरे आणि इतर मोठ्या नेत्यांची फौज उभी राहिली आहे. त्यामुळे आता महादेवराव महाडिक आणि काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्या पॅनेलला सतेज पाटील यांनी घडवलेले राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे पॅनलमधील कुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सहकार विभागाने या निवडणुकीची घोषणा केली आहे. २१ संचालक निवडीसाठी येत्या २ मे रोजी मतदान व ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी ३६५६ संस्थांचे ठरावदार मतदान करणार आहेत. त्यातच सत्ताधारी गटाचे ६ संचालक विरोधी आघाडीकडे गेले आहेत. त्यामुळे यंदा दोन्ही पॅनलचे उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गोकुळच्या आखाड्यात नेमके कोण ते २० एप्रिलला उमेदवार मागे घेण्याचा कालावधी संपेल तेव्हाच स्पष्ट होईल.
गोकुळचा निवडणूक कार्यक्रम
२५ मार्च ते १ एप्रिल – उमेदवारी अर्ज भरणे
५ एप्रिल – उमेदवारी अर्जाची छाननी
६ एप्रिल – वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे
६ ते २० एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
२२ एप्रिल – उमेदवारांना चिन्हांचे वाटप
२ मे – मतदान
४ मे – मतमोजणी