मुक्तपीठ टीम
सलग बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. खरंतर त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. मागील निवडणुकांचा विचार केल्यास असे दिसते की पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे दरवाढीला ब्रेक लावला गेला असावा. निवडणुका आल्या की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती परिणाम होत नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळीही असेच घडले होते.
आता निवडणुकीचा हंगाम आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये स्थिरता आहे. परंतु आसाम, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण गुरुवारीही कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आगामी काळात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८० ते ९० डॉलरपर्यंत जाऊ शकते.
सध्या अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. अशा स्थितीत सरकारवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा दबाव आहे. आत्ताच पाच राज्यांमधील निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेऊ शकेल. यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यापासून सरकारी इंधन कंपन्यांना रोखण्यात आले असावे. निवडणुका संपल्या की किंमती पुन्हा वेगाने वाढू शकतात. कारण कच्च्या तेलाचे दर अधिक वधारण्याची शक्यता आहे.