मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. शिवसेनेच्या दैनिक सामनाने केंद्रीय यंत्रणांच्या वापरावर भाजपाला टोले लगावलेत. त्याचवेळी आता ईडी या प्रकरणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ईडी लवकरच एनआयएकडून चौकशीचा सविस्तर तपशील घेणार आहे. परमबीर सिंग यांच्या आठ पानांच्या पत्रात सत्य आढळल्यास ईडी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून चौकशी सुरू करू शकते.
ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परमबीर सिंग यांच्या आरोपात सत्य असेल तर वर्षाकाठी हजारो कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा गुन्हा असू शकतो. याच्या मुळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. बेकायदेशीर कमाईतून तयार केलेली मालमत्ता शोधून ती जप्त करणे हे ईडीचे काम आहे. त्यामुळे ईडी या प्रकरणात तपास करणे कायदेशीरच असेल.
१०० कोटी म्हणजे मनी लाँड्रिंगचे प्रकरण!
ईडी सुत्रांच्या मते, सचिन वाझे यांचे प्रकरण हे थेट मनी लाँड्रिंगचे प्रकरण होते. आणि याची निश्चितपणे चौकशी केली जाईल. एनआयएकडून आतापर्यंतच्या तपासणीचा सविस्तर तपशील आणि एफआयआरची प्रत मिळताच गुन्हा नोंदविला जाईल.