मुक्तपीठ टीम
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता ईडीने त्यांच्या कुटुंबाचीही चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी ईडीने नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावले. मात्र, ईडीने मागणी केलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी फराज यांनी आठवड्याभराची मुदत देण्याची मागणी केली होती. मात्र ईडीने ही मागणी फेटाळून लावली आहे.
मलिकांच्या मुलाला ईडीचा दणका
- राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिम संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे.
- नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत.
- आता मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांना ईडीकडून समन्स बजावले असून चौकशीसाठी बोलावले आहे.
- ईडीकडून समन्स बजावूनही फराज चौकशीसाठी हजर झाले नाहीत, असे सांगण्यात येत होते.
- दरम्यान, फराज मलिक यांनी वकिलांमार्फत संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आठवडाभराचा वेळ मागितला होता.
- तशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती.
- मात्र, ईडीने ही विनंती फेटाळून लावली आहे.
मलिकांची ईडी कोठडी
- ईडीने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी अटक केली होती.
- त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
- दरम्यान नवाब मलिक यांना पोटदुखीची तक्रार होती, त्यानंतर त्यांना २५ फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- तब्बल चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची रवानगी पुन्हा ईडी कोठडीत करण्यात आली आहे.
- दुसरीकडे मलिक यांनी ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
- ईडीकडून झालेली अटक बेकायदा असून, राजकीय सूडापोटी ही कारवाई केली आहे, असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.
- या प्रकरणात आपली तात्काळ मुक्तता करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.