मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी देशातील १० राज्यांत संयुक्तरित्या छापेमारी केली आहे. या छाप्यांदरम्यान एनआयए आणि ईडीने दहशतवाद्यांना समर्थन केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या सुमारे १०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रातून २० जणांना एनआयएने ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे. एनआयएने हे आतापर्यंतचे सर्वात मोठे तपास ऑपरेशन असल्याचे म्हटले आहे.
एनआयए आणि ईडीने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा,उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात छापेमारी केली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या १०० सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “पीएफआयच्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक नेत्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. प्रदेश समिती कार्यालयावरही छापे टाकण्यात येत आहेत. पीएफआयने म्हटले आहे की, आम्ही निषेधाचा आवाज दाबण्यासाठी फॅसिस्ट राजवटीद्वारे केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराचा तीव्र विरोध करतो.
कर्नाटक, तामिळनाडूसह विविध राज्यांमध्ये एनआयएच्या छाप्यांविरोधात पीएफआय आणि एसडीपीआय सदस्य पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत.जिल्हा पीएफआय कार्यालयासह जिल्हास्तरीय नेत्यांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे.