मुक्तपीठ टीम
कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना मंगळवारी मुंबई ईडी झोन-२चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार अखेर अटक झाली.
एकीकडे सामान्य गुंतवणूकदारांच्या कष्टाच्या पैशासाठी सातत्यानं संघर्ष करीत असलेली संघर्ष समिती आणि दुसरीकडे भाजपाचे नेते आमदार प्रशांत ठाकूर श्रेय घेत असल्याने नेमके श्रेय कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात श्रेय कुणाचंही असलं तरी आता ईडीनं केवळ विवेक पाटलांपर्यंतच न थांबता बँकेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सर्वांचीच चौकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. कारण बँकेच्या लुटीत अनेक राजकारणी कमी अधिक प्रमाणात, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होते, असा आरोप आहे.
सामान्य बँक ठेवीदारांना बुडवणारा कर्नाळा बँक घोटाळा
• पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत, असा आरोप आहे.
• ५० हजार ६८९ ठेवीदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या.
• बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता.
• मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.
• रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते.
• सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पूर्नतपासणी केल्यानंतर ६३ कर्ज खात्याद्वारे ५१२ कोटीचा घोटाळा उघड झाला होता.
• त्यानंतर चौकशीत तो आकडा ५२९ कोटीवर गेला आहे.
संघर्ष समितीचा सहकार खाते ते ईडीपर्यंत पाठपुरावा
• पनवेल संघर्ष समितीने सहकार खाते, गृहखात्याच्या गुप्तवार्ता विशेष गुन्हे शाखा (सीआयडी) आणि ईडीच्या प्रमुखांना भेटून सखोल चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत पाठपुराव्याचा रेटा लावला होता.
• त्यानुसार सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधववार यांनी दिलेल्या निर्णयावर पनवेल संघर्ष समितीने आक्षेप घेत पूर्नचौकशीची मागणी सहकार सचिवांकडे केली आहे.
• सीआयडीच्या उपअधिक्षक सरोदे यांच्याकडे तगादा लावल्यानंतर त्यांनी विवेक पाटलांसह, अभिजित पाटील आणि सावंत यांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती.
• राज्याच्या ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांची भेट घेवून संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी कर्नाळा बँकेच्या प्रारंभापासूनच्या व्यवहाराची चौकशी करून संबंधित घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
• त्यानुसार सुशिल कुमार यांनी गुन्ह्याचा तपास झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांच्याकडे सोपविला होता. सध्या महत्वाचे गुन्हे तपासासाठी असल्याने दोन त तीन महिन्यात ही केस दाखल करण्यात येईल, असे आश्वासन सुशिल कुमार यांनी कांतीलाल कडू यांना दिले होते.
• बुधवारी १५ जून रोजी सुनील कुमार यांनी विवेकानंद पाटील यांना अटक केली आहे.
कर्नाळा बँकेचा ईडी स्वतंत्र्यरित्या तपास करणार असल्याने आता कुणाकुणावर अटकेची कारवाई होते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, पनवेल संघर्ष समितीच्या कर्नाळा बँक लढ्याला मोठे यश आले आहे, यापुढील काळातही आम्ही लढत राहू, असे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जाहीर आहे.