लाल मातीची मूर्ती. देखणेपणात जराही उणीव नसणारी. चेहऱ्यावर तेच आनंददायी भाव. दर्शनानं मनाला लागणारं अविट समाधान. या मूर्तीचं विशेष म्हणजे पीओपी वगैरे सोडाच पण ही मूर्ती शाडूचीही नाही. ही आहे लाल मातीची. शाडू्ची मातीही तशी जलस्त्रोतांसाठी चांगली नाही. त्यातून सध्या लाल मातीच्या मूर्तीं बनवल्या जात आहेत. मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात शिंदे कुटुंबीय राहतात. गजानन परशुराम शिंदे मर्चंट नेव्ही सेवेत होते. जगभर सागरी पर्यटन करताना त्यांना पर्यावरणाचं महत्व मनावर ठसलं. त्यांचे चिरंजीवही त्याच क्षेत्रात करिअर करताना त्याच मताचे. त्यांच्यामुळे पर्यावरणविषयक सजगता संपूर्ण कुटुंबाच्याच स्वभावाचाच भाग झालेली. त्यातूनच मग घरगुती गणेशोत्सवात आधी शाडूची मूर्ती आणि मग गेली काही वर्षे फक्त लाल मातीची मूर्ती अवतरली.