मुक्तपीठ टीम
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक दुचाकींच्या मागणीमध्ये बरीच वाढ होत आहे. विविध वाहन उत्पादक इलेक्ट्रिक टूव्हीलर्स लॉन्च करत आहेत. देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओकिनावाने नवीन ओकिनावा ड्युअल इलेक्ट्रिक स्कूटर स्थानिक बाजारात लाँच केली आहे. ही स्कुटर एकदा चार्ज केली की १३० किलोमीटर धावू शकते. तसेच ही चालवण्यासाठी लायसनची गरज नाही.
ओकिनावा ड्युअल अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि फिचर्ससह सज्ज आहे. वस्तू वाहतुकीच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आणि व्यवसायांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ही डिझाइन केलेली आहे. चार्जिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने ४८ वॅट ५५ एएच ची डिटेचेबल बॅटरी देखील दिली आहे, जी दीड तासात ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते. संपूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे ४ ते ५ तास लागतात आणि एकदा चार्ज झाल्यावर ती १३० किमी अंतर धावते. ली-आयन बॅटरी पॅक असल्याने, ती वेगाने चार्ज होते. बी 2 बी वापरासाठी ही एक अतिशय विश्वसनीय दुचाकी बनली आहे.
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओकिनावाची नवी ई-स्कुटर जड सिलेंडर आणि ई-कॉमर्स वस्तूंच्या वितरणासारख्या कामांसाठी तयार केली आहे. कंपनीने सामान वाहतुकीची जास्तीत जास्त आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे, असा दावा केला आहे.
ओकिनावा ड्युअल इलेक्ट्रिक स्कूटर फायर रेड आणि सनशाईन यलो या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ओकिनावा ड्युअलमध्ये २५० वॅटची इलेक्ट्रिक मोटार लावली आहे आणि ती तासाला २५ किमी पर्यंत धावते. कमी वेगामुळे, त्यास चालविण्यासाठी नोंदणी किंवा वाहन चालविण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही.
ओकिनावाने दिलेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या सर्व उत्पादनांमध्ये ९२ टक्के देशी पार्ट्सचा वापर करतात. एप्रिल २०२१ पर्यंत ते उत्पादन १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक जितेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाईकची किंमत सुमारे ५९ हजार रुपये आहे.
पाहा व्हिडीओ: