मुक्तपीठ टीम
डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना चालविणारा ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या आरिफ भुजवालाच्या अटकेनंतर दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे उघड करण्यात नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांना यश येत आहे. गेल्या काही वर्षांत आरिफने ड्रग्ज तस्करीतून कोट्यवधी रुपयांची प्रॉपटी जमा केली असून त्याची मुंबई सेंट्रल, डोंगरी आणि मिरारोड परिसरात पाच कोटी रुपयांची प्रॉपटी आहे. त्याच्या नावावर एक मोठी शेतजमिन असून विविध बँकेत पाच ते सहा खाती आहे. या खात्यात कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रॉपटीसह बँक खाते सील करण्याची प्रक्रिया एनसीबीने सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वी आरिफची पत्नी पाकिस्तानात गेली होती. तिचे पाकिस्तानात जाण्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. या पती-पत्नीचा देशविघातक अतिरेकी संघटनेशी काही संबंध आहेत का? याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
सिनेअभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा तपास करताना बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. त्यामुळे एनसीबीने स्वतंत्र गुन्हे दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान या अधिकार्यांनी एकापाठोपाठ एक ड्रग्जच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींची नावे समजली होती. या सर्वांवर नंतर एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यातच गेल्या काही दिवसांत ड्रग्ज तस्काराविरुद्ध एनसीबीने धडक मोहीम सुरु केली होती. ही कारवाई सुरु असतानाच या अधिकार्यांनी जे. जे मार्ग परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना अटक केली होती, या दोघांकडून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यांच्या चौकशीत परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण याचे नाव समोर आले होते. परवेज हा करीमलालाचा नातेवाईक आणि दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध एनडीपीएससह इतर काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी तडीपार केले होते. परवेज हा मुंबईबाहेर राहूनच दक्षिण मुंबईत ड्रग्जचे एक मोठे रॅकेट चालवित असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याचे सर्व व्यवहार सध्या नवी मुंबईतील घणसोली परिसरातून चालत असल्याने एनसीबीच्या एका विशेष पथकाने घणसोली परिसरातील एका फ्लॅटमध्ये छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान परवेजसह झाकीर हुसैन फझल शेख या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडून पोलिसांनी ५२ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, काही कॅश आणि एक पिस्तूल जप्त केले होते.
तपासात असे समोर आले की, परवेज हा दाऊदचा अत्यंत खास आणि जवळचा सहकारी म्हणून गुन्हेगारी जगतात परिचित आहे. तो दाऊद टोळीसाठी ड्रग्ज तस्करीचे सर्व व्यवहार सांभाळत होता. त्यातून येणारी रक्कम तो हवालामार्फत दुबई येथे पाठवित होता. तडीपार केल्यांनतर त्याने नवी मुंबईत स्वतचे बस्तान बसविले होते. तेथून तो त्याच्या टोळीचे सूत्र हलवित होता. पवेज हा राज्यातील एक मोठा ड्रग्ज सप्लायर म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे कुठल्याही ड्रग्जची मागणी करा. ते ड्रग्ज संबंधित व्यक्तींना काही तासात मिळणार अशी ओळख परवेजची होती. परवेजच्या चौकशीत आरिफ भुजवाला याचे नाव समोर आले होते. आरिफ हा त्याचा खास सहकारी असून तो डोंगरीतील नूर मंझिल इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे छापा टाकला होता. मात्र एनसीबीची कारवाई होण्यापूर्वीच आरिफ हा तेथून पळून गेला होता. त्याच्या नूर मंझिल इमारतीच्या चवथ्या मजल्यावर या अधिकार्यांना ड्रग्ज बनविण्याचा एक कारखानाच सापडला. गेल्या पाच वर्षांपासून तिथे ड्रग्ज बनविले जात होते. या लॅबमधून या अधिकार्यांनी बारा किलो ड्रग्जसह काही केमिकल्स हस्तगत केले होते. त्यानंतर आरिफच्या घरी या अधिकार्यांनी छापा टाकला होता. या छाप्यात या अधिकार्यांना २ कोटी १८ लाख रुपये आणि एक रिव्हॉल्व्हर सापडले. तपासात आरिफ आणि परवेज हे दोघेही दक्षिण मुंबईत ड्रग्जचे नेटवर्क चालवत असल्याचे उघडकीस आले. आरिफ हा विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्याविरुद्ध एनसीबीने एलओसी जारी केले होते. त्याचा शोध सुरु असतानाच त्याला माणगाव येथून या पथकाने अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या एनसीबी कोठडीत असून या चौकशीत त्याने ड्रग्ज व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या मालकीचे मिरारोड, मुंबई सेंट्रल आणि डोंगरी परिसरात सुमारे पाच कोटी रुपयांची प्रॉपटी आहे. ही प्रॉपटी जप्त करण्याची प्रक्रिया एनसीबीने सुरु केली आहे. त्याच्या राहत्या घरी या अधिकार्यांना एका शेतजमिनीचे काही कागदपत्रे सापडले आहेत.
आरिफचे विविध बँकेत पाच ते सहा खाती आहेत. त्यात किती रुपये आहेत? या खात्यातून आतापर्यंत किती रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आरिफची पत्नी काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात गेली होती. आरिफच्या ड्रग्ज व्यवसायात तिचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. ती पाकिस्तानाला कशासाठी आणि कोणाला भेटण्यासाठी गेली होती याचा तपास सुरु असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. दुसरीकडे एनसीबीच्या अधिकार्यांनी शुक्रवारी अंधेरी, वसई आणि मिरारोड परिसरात छापे टाकले होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यामुळे त्याचा तपशील समजू शकला नाही. आरिफची इतर कुठे प्रॉपटी आहे का? त्याचे कोणाशी संबंध आहे? त्याला ड्रग्ज व्यवसायासाठी कोणी आर्थिक मदत केली याचा आता एनसीबीकडून तपास सुरु आहे.